कोरोनाबाधित शिक्षकाचे लक्ष्मण यांच्याकडून 'व्हेरी व्हेरी स्पेशल' कौतुक

Kifayat Hussain, Maths teacher,VVS Laxman
Kifayat Hussain, Maths teacher,VVS Laxman

नवी दिल्ली : लडाखमधील एका कोरोनाबाधित शिक्षकाने आयसोलेशन सेंटरमध्ये राहून सर्वांपासून स्वत:ला दूर ठेवले खरे, परंतु ते आपल्या विद्यार्थ्यांपासून दूर राहू शकले नाही. ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात असून ज्ञानदानाचे कार्य त्यांचे आयसोलेशन सेंटरमधूनही सुरू ठेवले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये, म्हणून लडाखच्या त्या शिक्षकाने पुढाकार घेतला आणि त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनाबाधित शिक्षकाच्या धाडसाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांनी देखील या शिक्षकाचे कौतुक केले आहे.   

लक्ष्मण यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, गणिताचे शिक्षक किफायत हुसेन हे कोरोनाबाधित असून ते आयसोलेशनमध्ये असल्यापासून ऑनलाइन वर्ग घेत आहेत. अडचणींच्या काळातही त्यांनी धाडस दाखवून कामाप्रती दाखविलेली निष्ठा कौतुकास्पद आहे, असे ट्विट माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांनी केले आहे.  कोविड-19 वरून आज जगभरातील नागरिक धास्तावले आहेत. त्यापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाय करत आहेत. कोरोनाची बाधा होऊ नये आणि त्याचा त्रास कुटुंबाला होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे. परंतु लेह येथे राहणारे किफायत हुसेन यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले खरे, परंतु त्यांना आजारापेक्षा मुलांच्या अभ्यासाची चिंता वाटू लागली. शेवटी त्यांनी शासकीय परवानग्या मिळवत आयसोलेशन सेंटरमधून ऑनलाईन वर्ग घेण्यास सुरवात केली.

विलग असताना कोरोनाशी सामना करताना हुसेन हे नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना गणीत शिकवत आहेत. त्यांनी आपल्या खोलीत फळा लावला असून त्याच्यासमोरच मोबाइलचे स्टँड उभारले आहे. मोबाईलचा कॅमेरा फळ्याच्या दिशेकडे असून त्यावर मार्कर पेनने गणित विषय शिकवतात. हुसेन म्हणतात, की आपण झूम ॲपच्या मदतीने सतत ऑनलाइन क्लास घेत असून यूट्यूब व्हीडिओच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना जोडलेलो आहोत. विद्यार्थ्याच्या अडचणी फोनवरुन दूर करत आहेत. दररोज ते दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत हुसेन हे झूम ॲपने विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.  

काय घडले 
लडाखच्या लामदोन येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने कंटन्मेंट क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. किफायत हुसेन यांना कोणतेही लक्षणे नव्हती. ते लामदोन मॉडल सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहेत. परंतु त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्यामुळे त्रास होऊ नये यासाठी स्वत:च चाचणी करण्याचा निर्णय घेतला. ३० एप्रिल रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यानंतर त्यांना आयसोलेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. परंतु त्यांनी ऑनलाइनवर शिकवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी लडाख प्रशासनाची परवानगी घेतली. याकामी त्यांना शाळा प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पालकांनी सहकार्य केले. 

अध्यापनाकडे आपण नोकरी म्हणून नाही आवड म्हणून पाहतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येऊ नये, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी बरा झाल्यानंतर शिकवण्यास सुरुवात केली तर दडपण वाढले असते. आजारी असतानाही माझ्यात शिकवण्यात शक्ती आहे. या शक्तीचा उपयोग करण्याचे मी ठरवले, असे  किफायत हुसेन यांनी म्हटले आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com