आम्ही 'पॅकेज'च्या जाहिराती करत नाही; आम्ही कामं करतोय : मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर घणाघाती टीका

आम्ही 'पॅकेज'च्या जाहिराती करत नाही; आम्ही कामं करतोय : मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर घणाघाती टीका

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्यात. ईद साजरी करताना घरात बसूनच साजरी करण्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसंच होळीनंतरचे सर्व सण शिस्तबद्ध पद्धतीनं साजरे केल्याचं त्यांनी सांगितले या फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि लॉकडाऊननंतरचा टप्पा कसा असेल याबाबत जनतेला माहिती दिली.

महाविकास आघाडी पोकळं घोषणा करणार नाही 
राज्यात पॅकेजची का घोषणा केली जात नाही असं काहीजण विचारत आहे. पण आजच्या परिस्थितीत गोरगरिबांना अन्न मिळणं, उपचार मिळणं हे अधिक महत्त्वाचं आहे. सरकारनं आज गरिबांवर उपचार करण्यासाठी मदत केली. गरिबांना शिवभोजन योजनेअंतर्गत पाच रुपयांतं जेवण दिलं गेलं. 7 ते 8 लाख मजुरांना स्वगावी पाठवलं. यासाठी कुठलं पॅकेज द्यायचं असा सवाल करत महाविकास आघाडी पोकळ घोषणा करणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

हात जोडून रक्तदान करण्याची विनंती
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत चालली आहे. कोरोना आणि इतर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांसाठी राज्याला पुन्हा एकदा रक्तदानाची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी हात जोडून जनतेला रक्तदान करण्याची विनंती केली. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवला होता. यानंतर आम्ही आवाहन केल्यानंतर त्याला राज्यातल्या जनतेने चांगला प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद इतका चांगला होता की आम्हाला आता रक्ताची गरज नाही, पुरेसा साठा आहे असं सांगावं लागलं. पण राज्याला पुन्हा एकदा रक्तदानाची गरज आहे. त्यामुले ज्यांना ज्यांना रक्तदान करणं शक्य आहे त्यांनी अवश्य रक्तदान करावं, असं विनंती मुख्यमंत्र्यांनी जनतेला केली आहे.

मुख्यमंत्र्यांचा जनतेला गंभीर इशारा 

राज्यात येत्या काळात कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट होणार असल्याचा गंभीर इशारा मुख्यमंत्र्यांनी आज झालेल्या फेसबुक लाईव्हमध्ये दिला. कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आता गुणाकार जीवघेणा होणार आहे, केसेस वाढणार असल्याचं सांगत आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आपण कोरोनाविरोधात लढाईसाठी सज्ज आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

आतापर्यंत जशी रुग्णसंख्या वाढली तशीच ती येत्या पुढच्या काळातही वाढणार आहे. कोरोनाविरोधातील राज्याची लढाई अधिक बिकट होणार आहे. पण यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नाही. कोरोनावर मात करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण करत असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत 14 हजार बेड उपलब्ध होतील, असं देखील त्यांनी सांगितलं.

दुखणं अंगावर काढू नका

पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे इतर साथीच्या रोगांपासूनही आपल्याला काळजी घ्यायची आहे. दुखणं अंगावर काढू नका, काही लक्षणं दिसत असतील तर लगेचच डॉक्टरकडे जा. काही रुग्ण शेवटच्या टप्प्यात आल्यावर किंवा लक्षणं वाढल्यावर अनेकजण येतात. त्यामुळे अनेकांचे मृत्यू झालेत. तसंच वेळेवर उपचार मिळाल्यानं आणि प्राथमिक आल्यावर जास्तीत जास्त रुग्ण बरी होऊन घरी जात आहेत, असंही ते म्हणालेत.

विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला
येत्या काळात एक हजारहून आता 7 हजार बेड रुग्णालयात उपलब्ध होतील. तर मे च्या अखेरीस 14 हजार बेड रुग्णालयात असतील. जनतेनं शिस्त पाळली म्हणून कोरोनावर मात करणं शक्य झालं. हा आजार गुणाकाराने वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी शहरांमध्ये जनजागृती करणारे होर्डिेंग्स लावण्यात आले असल्याचंही त्यांनी म्हटलं.  राज्यभरात गोरगरीब, मजूरांसह लाखो लोकांना मदत केली आहे. त्याची जाहिरात करायची का? असा टोला देखील त्यांनी लगावला. आम्ही रोज 80 ट्रेनची मागणी केंद्राकडे केली आहे. पण प्रत्यक्षात 40 ट्रेनचं मिळत आहेत. मजुरांना घरी पाठवण्याची व्यवस्था करत आहोत. त्यांचा खर्च आम्ही करत आहोत, असं त्यांनी सांगितलं. एसटीच्या माध्यमातून लाखो लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेजवळ सोडलं जात आहे. त्यासाठी 75 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. यासाठी कुठलं पॅकेज घोषित करायचं? असा सवाल देखील त्यांनी केला.

राज्यातल्या कोरोनाचा आकडा 
महाराष्ट्रामध्ये दीड लाख आकडा असेल असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात 33 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 13 हजाराच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. हे सगळं नागरिकांमुळे शक्य झालं आहे, तर साडे तीन लाखाच्या आसपास चाचण्या झाल्या आहेत. 1577 मृत्यू झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलांची बालक निगेटिव्ह जन्माला आली. छोट्या बालकांपासून मोठ्यांपर्यंत लोक बरे होत असल्याचंही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

31 मे नंतर काय? 
सध्या महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन आहे. 31 तारखेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. त्यानंतर काय? असा प्रश्न सगळ्यांपुढे आहेच. लॉकडाऊनचा प्रत्येकालाच कंटाळा आला आहे. मात्र एकदम लॉकडाऊन करणं हे जसं चुकीचं आहे तसं तो एकदम उठवणंही चुकीचं आहे. हळूहळू सगळं सुरु करतो आहोत मात्र गर्दी झाली तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

दुकानं, उद्योगधंदे, व्यवसाय सगळं सुरु होईल. मात्र शिस्त पाळली गेली नाही तर सगळं बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊन शब्द वापरणं बंद करा, असंही ते म्हणालेत. 

कोरोनानं आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आता कोरोनासोबत जगायचं आहे, असंही ते म्हणालेत. आपण हळूहळू आपल्या आयुष्याची गाडी पूर्वपदावर आणत आहोत. मात्र हे करताना आपल्याला काळजी घ्यायची असल्याचंही त्यांनी सांगितली आहे. 

लवकरच देशाच चित्र स्पष्ट होणार 
येत्या 15 दिवसात देशातलं चित्र स्पष्ट होईल. स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे असं मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितलं. सध्या राज्यात 50 हजार उद्योग सुरु झाले असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. तसंच शेतकऱ्यांना बांधावरच बी- बियाणे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 75 ते 80 टक्के कापूस खरेदीचाही विचार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.  

राजकारण करु नका, विरोधकांना टोला 
सध्याचा काळ हा राजकारण करण्याचा काळ नाही आहे. अडचणीच्यावेळी राजकारण करणं हे माझ्या संस्कृतीत नाही. कृपा करुनही राजकारण करु नये. सध्या आपण कोरोना नावाच्या संकटाशी लढा देत आहोत. राजकारण तुम्ही सुरु केलं असलं तरीही आम्ही सुरु केलेलं नाही. राज्यावरचं संकट टाळलं जाणं जास्त महत्त्वाचं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com