
लस घेतल्यानंतर आपण कोरोनापासून कितपत सुरक्षित होऊ शकता हा खरा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय.
नवी दिल्ली : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका पुरुष नर्सला 18 डिसेंबर रोजी कोरोनाच्या विषाणू विरोधात लढण्यासाठी फायझरची लस देण्यात आली होती. सहा दिवसांनंतर त्याला थंडी वाजू लागली. त्याच्या हाडामांसामध्ये वेदना होऊ लागल्या आणि त्याला थकल्यासारखे वाटू लागले. 26 डिसेंबर रोजी तपासणीत हा व्यक्ती कोरोनामुळे संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या लशीच्या प्रभावीपणावर तसेच सुरक्षितपणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. लस घेतल्यानंतर आपण कोरोनापासून कितपत सुरक्षित होऊ शकता हा खरा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होताना दिसतोय. ऑक्सफर्डच्या लशीलाही ब्रिटनने मंजूरी दिल्यानंतर आता हा प्रश्न आणखीनच महत्त्वपूर्ण बनला आहे.
याआधी ब्रिटनमध्ये अधिक जोखिम असलेल्या लोकांना लशीचे दोन खुराक देऊन कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी संपूर्णत: सक्षम बनवण्याची योजना आखण्यात आली होती. आता त्यांच्या राष्ट्रीय नीतीमध्ये म्हटलं गेलंय की आधी जास्तीतजास्त लोकांना लशीचा पहिला खुराक दिला जाईल. मात्र, कॅलिफोर्नियातील नर्सला पहिला डोस दिल्यानंतर देखील कोरोना झाल्यामुळे या रणनीतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, भारतात ऑक्सफर्ड लशीला मंजूरी मिळणे जवळपास निश्चितच झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाला लशीचा पहिला खुराक देण्याबाबतची रणनीती खूपच महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
हेही वाचा - ऑक्सफर्ड लशीबाबत आली गुड न्यूज; परवडणाऱ्या लशीबद्दल जाणून घ्या सर्वकाही
मोठ्या अंतरानंतर दुसरा डोस देणे प्रभावी
ऑक्सफर्ड लशीच्या अभ्यासात आधी असं म्हटलं होतं की, लशीचा पहिला खुराक दिल्यानंतर दुसऱ्यांदा त्याचा पूर्ण खुराक दिला तर तो 30 टक्के अधिक प्रभावी होतो. मात्र बीबीसीच्या रिपोर्टनुसार, ऑक्सफर्ड लशीच्या नव्या अभ्यासात आढळून आले आहे की, एक खुराक दिल्यानंतर दुसऱ्या खुराक मोठ्या अंतरानंतर देणे प्रभावी ठरू शकते.
लवकरच भारतातही लशीकरण
भारतात लवकरच या लशीला एक-दोन दिवसांत मान्यता मिळून येत्या जानेवारीच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात लशीकरणास सुरवात होईल. मोठ्या प्रमाणावर जेंव्हा लशीकरण केले जाईल, तेंव्हा कोरोना विरोधातील लढाईत त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. या लशीचे दोन खुराक घ्यावे लागणार आहे. पहिला खुराक दिल्यानंतर साधारणत: तीन ते चार आठवड्यांतच 60 ते 70 टक्के संरक्षण प्राप्त होणार आहे. त्यानंतर दुसरा खुराक दिल्यानंतर या लशीद्वारे जवळपास 90 टक्के संरक्षण मिळणार आहे. जर दोन खुराकांमधील अंतर वाढवलं तर त्याचा संरक्षणाच्या दृष्टीने अधिक फायदा होतो, असं ऑक्सफर्डच्या अलिकडच्या अभ्यासात स्पष्ट झालं आहे. दुसरा खुराक हा तीन आठवडे ते तीन महिन्यांमध्ये दिला जाणे अपेक्षित आहे.
अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने म्हटलंय की, फायझर-बायोनटेक लशीचा पहिला खुराक 82 टक्के प्रभावी आहे तर मॉडर्ना लशीचा पहिला डोस दोन आठवड्यानंतर 92 टक्क्यांपर्यंत प्रभावी होतो. या पार्श्वभूमीवर प्रश्न निर्माण होतो की, पहिला खुराकच एवढा प्रभावी आहे तर दुसरा खुराक घ्यायची गरजच काय आहे? या प्रश्नाचे उत्तर येल युनिव्हर्सिटीचे इम्यूनिलॉजी एक्सपर्ट अकीको इवासाकी देतात की, दुसऱ्या खुराकानंतर आपली रोग प्रतिकार शक्ती मोठ्या काळापर्यंत टिकून राहते. तर वॉशिंग्टन पोस्टमध्ये दावा केलाय की, पहिला खुराक प्रतिकार शक्तीला कोरोना व्हायरसला ओळखून त्याच्याशी लढण्याची शक्ती देतो तर दुसरा खुराक प्रतिकार शक्तीला अधिक काळापर्यंत टिकवून ठेवतो.
संथ गतीने तयार होते प्रतिकारशक्ती
शक्यता अशी आहे की, ज्या दिवशी त्या नर्सला लस दिली गेली असेल त्याच दिवशी ती व्यक्ती कोरोनाने संक्रमित झालेली असावी. त्यामुळेच सहा दिवसांनंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसून आली असावीत. सामान्यत: लस आपले काम सुरु करायला जास्त वेळ घेत नाही.