ऑक्सफर्ड लशीबाबत आली गुड न्यूज; परवडणाऱ्या लशीबद्दल जाणून घ्या सर्वकाही

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

भारतात या लशीला एक-दोन दिवसांत मान्यता मिळून येत्या जानेवारीच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात लशीकरणास सुरवात होईल, अशी शक्यता आहे.

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राझेनेका यांनी संयुक्त विद्यमाने तयार केलेली कोरोनावरील लस 'कोविशिल्ड' म्हणून ओळखली जाते. या लशीला ब्रिटनमध्ये कालच आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने भारतात पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियासोबत करार करुन या लशीची निर्मिती तसेच चाचणी घेतली आहे. या लशीला भारतात मान्यता देण्याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. UK च्या Medicines and Healthcare products Regulatory Agency (MHRA) ने मंजूरी दिल्यानंतर भारतातील ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाने यास नामंजूर करण्याचे कसलेही कारण नाही. कारण या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये ही लस परिणामकारक तसेच सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे या लशीला मान्यता मिळणे खूप आवश्यक होते.

'कोविशिल्ड' मॉडर्ना-फायझर लशीहून तुलनेने सहजसुलभ
याआधीच जगात दोन लशींना मान्यता मिळाली आहे. यामध्ये फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या लशींना मान्यता दिली गेली आहे. परंतु, फायझर आणि मॉडर्नाच्या लशी या तुलनेने खूप महाग आहेत. ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल, कॅनडा अशा बऱ्याचशा युरोपियन देशांमध्ये या लशींच्या लशीकरणास सुरवात झाली आहे. फायझरची लस -70 डिग्री सेल्सियसवर ठेवावी लागते. मॉडर्नाची लस -20 वर ठेवावी लागते. थोडक्यात, या दोन्ही लशींची साठवणूक तसेच दळणवळण करणे ही खर्चिक बाब आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला या लशींचे लशीकरण करणे तुलनेने अवघड आहे. परंतु, ऑक्सफर्ड लशीचे वैशिष्ट्य असं आहे की, ही लस साध्या रेफ्रिजरेटरमध्ये 2 ते 8 डिग्री तापमानावर सहा महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येते.

हेही वाचा - ब्रिटनमधील कोरोनाचा नवा स्ट्रेन डिसेंबरपूर्वीच भारतात, AIIMS च्या प्रमुखांनी व्यक्त केली शक्यता

इतर लशींहून अत्यंत स्वस्त
या लशीची किंमत देखील खिशाला परवडणारी असणार आहे. ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनेकाने आधीच जाहीर केलं होतं की ही जागतिक महामारी संपूपर्यंत या लशीमधून कसल्याही प्रकारचा व्यावसायिक फायदा आम्ही कमावणार नाहीयोत. साधारणत: तीन अमेरिकन डॉलर्सला या लशीचा खुराक उपलब्ध होणार आहे. म्हणजेच लशीचे आवश्यक दोन्ही खुराक अवघ्या पाच ते सहा डॉलर्समध्ये घेता येणे शक्य आहे. भारतीय चलनामध्ये बोलायचे झाल्यास अवघ्या पाचशे रुपयांत या लशीचे लशीकरण शक्य आहे. 

जगभरात ठिकठिकाणी ठरेल स्थानिक लस
तसेच या लशीचे वैशिष्ट्य असं असणार आहे की जगाच्या बहुतांश भागामध्ये ही स्थानिक लस असणार आहे. थोडक्यात भारतात या लशीची निर्मिती जशी सीरम इन्स्टीट्यूट करत आहे त्याचप्रमाणे जगभरात इतर देशांतही ऑक्सफर्डने स्थानिक कंपन्यांशी निर्मितीबाबत करार केले असल्याने ही लस स्थानिक असणार आहे तसेच तिचे दळणवळण करणे सोपे पडणार आहे. भारताव्यतिरिक्त ब्रिटन, अमेरिका, अर्जेंटीना, चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये ही लस स्थानिक पातळीवरच निर्माण केली जाणार आहे. त्या त्या देशांची गरज  पूर्ण झाल्यानंतर इतर गरीब देशांना या लशीचा पुरवठा करण्यात येईल. WHO ने लशीकरणासाठी COVAXIN नावाचा जो प्रोजेक्ट लाँच केलाय त्यामध्ये देखील कोविशिल्ड लशीची मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली आहे.  

हेही वाचा - अखेर लस मिळणार; सीरमच्या लशीला मंजुरी मिळण्याची शक्यता

लशीचे असतील दोन खुराक
भारतात लवकरच या लशीला एक-दोन दिवसांत मान्यता मिळून येत्या जानेवारीच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात लशीकरणास सुरवात होईल. मोठ्या प्रमाणावर जेंव्हा लशीकरण केले जाईल, तेंव्हा कोरोना विरोधातील लढाईत त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. या लशीचे दोन खुराक घ्यावे लागणार आहे. पहिला खुराक दिल्यानंतर साधारणत: तीन ते चार आठवड्यांतच 60 ते 70 टक्के संरक्षण प्राप्त होणार आहे. त्यानंतर दुसरा खुराक दिल्यानंतर या लशीद्वारे जवळपास 90 टक्के संरक्षण मिळणार आहे. जर दोन खुराकांमधील अंतर वाढवलं तर त्याचा संरक्षणाच्या दृष्टीने अधिक फायदा होतो, असं ऑक्सफर्डच्या अलिकडच्या अभ्यासात स्पष्ट झालं आहे. दुसरा खुराक हा तीन आठवडे ते तीन महिन्यांमध्ये दिला जाणे अपेक्षित आहे. 

जर याप्रकारे व्यूहरचना केली गेली तर लवकरात लवकर कोरोनाची जागतिक साथ संपुष्टात येईल. मात्र, त्याचं अस्तित्व संपणार नाहीये. प्रत्येक देशामध्ये तो कमी-अधिक फरकाने असेल. थोडक्यात, जागतिक साथ संपल्याने जीवन शीघ्र गतीने पूर्ववत होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know all about AstraZeneca Oxford vaccine Covishield vaccine how india is going to vaccinate against covid19