जयललितांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या शशीकला आहेत तरी कोण?

v k sasikala
v k sasikala

चेन्नई : तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या व्हीके शशीकला यांनी काल बुधवारी संध्याकाळी आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. तमिळनाडूच्या विधानसभेच्या निवडणुका येत्या काही दिवसांत होणार आहेत. त्याआधीच त्यांच्या या घोषणेमुळे त्या चर्चेत आल्या आहेत. मात्र तमिळनाडूच्या राजकारणात महत्त्वाची भुमिका वठवणाऱ्या व्हके शशीकला नेमक्या आहेत तरी कोण? जयललिता आणि त्यांचं नातं काय? कसा राहिलाय त्यांचा राजकीय प्रवास? याविषयीच आपण आज माहिती घेणार आहोत.

कधीकाळी तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर कुणाचं नाव घेतलं जायचं तर ते होतं शशीकला यांचंच! मुख्यमंत्री पदावर जयललिता होत्या... मात्र पडद्याच्या मागे त्यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयामागे आणि हालचालीमागे शशीकला यांचा सल्ला असायचा, असं म्हटलं जायचं. त्या यावर्षीच जानेवारी महिन्यात तुरुंगातून सुटून आल्या आहेत. भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी त्यांना कोर्टाने 4 वर्षांची जेल सुनावली होती. त्यांच्या या सुटकेनंतर येऊ घातेलल्या तमिळनाडूच्या राजकारणात काय घडेल, याची उत्सुकता असतानाच त्यांच्या निवृत्तीची ही घोषणा झाली आहे. या शशीकला काही सामान्य कार्यकर्त्या नव्हत्या. त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना आश्चर्यकारक आहेत. 90 च्या दशकात त्या जयललितांना भेटल्या. त्यानंतर त्यांच्यात दिवसेंदिवस घट्ट मैत्री बनत गेली.. इतकी दृढ मैत्री की जयललितांनंत त्यांचंच नाव घेतलं जायचं. 1984 साली शशीकला एक व्हिडीओ पार्लर चालवायच्या. त्यांचे पती नटराजन जनसंपर्क अधिकारी होते. शशीकला यांना जयललिता यांच्या मींटिंगमध्ये व्हिडीओग्राफी करण्याची संधी मिळाली आणि तिथेच या दोघींचीही एकमेकांशी भेट झाली. या एका साध्या भेटीने पुढे तमिळनाडूचं राजकारण ढवळून काढलं. 

शशीकला यांचा जन्म 1956 साली झाला असून त्यांनी  फक्त 10 वी पर्यंतच शिक्षण घेतलं आहे. जयललितांशी भेट झाल्यानंतर त्या त्यांच्या विश्वासू बनत गेल्या. जयललिता त्यावेळी राज्यसभा सदस्य होत्या. 1988 पासूनच जयललितांचे निवास स्थान म्हणजेच पोएस गार्डन शशीकला यांचंदेखील निवासस्थान बनलं  होतं. मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्या जयललितांच्या आणखीनच जवळच्या बनल्या. त्यावेळी अन्नाद्रमुकचे दोन भाग झाले होते. त्यावेळी शशीकला यांचे विश्वासपात्र लोक पक्षातील पदाधिकारी बनले. 1991 मध्ये जेंव्हा जयललिता पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या तेंव्हा त्या प्रत्येक गोष्टीसाठी शशीकला यांचा सल्ला घ्यायच्या. याच काळात जयललिता यांना अम्मा आणि शशीकला यांना चिनम्मा नावाने लोक ओळखू लागले होते. शशीकला एकप्रकारे जयललिता यांच्या सावलीच बनल्या होत्या. जयललिता यांनी लग्न केलं नव्हतं त्यामुळे शशीकला यांचे पती, भाऊ आणि निकटवर्तीयांचाच पक्षामध्ये दबदबा वाढत गेला. शशीकला यांचेच एक नातेवाईक वीएन सुधाकरन यांना जयललितांनी आपला दत्तक पुत्र बनवलं. त्याचं लग्न इतक्या दिमाखात झालं की सर्वांत खर्चिक लग्न म्हणून त्याची गिनीज बुकमध्ये नोंद देखील झाली. 

1996 मधील निवडणुकीत जयललिता हारल्या. यामागे शशीकला यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीय कारणीभूत होते, असं म्हटलं गेलं. जयललिता यांना शशीकला यांच्यासोबत जेलमध्ये देखील जावं लागलं होतं. दोघींच्या दरम्यान अंतर वाढलं मात्र पुन्हा त्यांच्यात जवळीक वाढळी. त्यानंतर जयललिता पुन्हा 2011 मध्ये मुख्यमंत्री बनल्या. यादरम्यान पुन्हा एकदा जयललिता यांना शंका आली की शशीकला त्यांच्याविरोधातच कट करत आहे. त्यावेळी 19 डिसेंबर 2011 मध्ये शशीकला आणि त्यांच्या नातेवाईकांना पार्टीतून हाकलण्यात आलं. मात्र त्यानंतर तीन महिन्यांनीच 28 मार्च 2012 मध्ये शशीकला यांनी जाहीर केलं की त्यांना पक्षात, खासदारकीत अथवा आमदारकीत कसलाही रस नाहीये. त्या फक्त जयललितांच्या जवळच्या बहिण म्हणून राहू इच्छित आहेत. त्यानंतर लगेचच शशीकलांना पुन्हा एकदा पक्षात एंट्री मिळाली. त्यानंतर जयललितांच्या शेवटच्या श्वासापर्यंत या दोघींचीही मैत्री राहीली. मात्र, त्यानंतर शशीकला यांना पुन्हा एकदा पक्षाच्या जनरल सेक्रेटरी पदावरुन काढण्यात आलं. आणि त्यानंतर त्यांनी AMMK नावाचा नवा पक्ष स्थापन केला. शशीकला गेल्या जानेवारीत तुरुंगातून सुटल्यानंतर असं मानलं जात होतं की तमिळनाडूच्या राजकारणात काही वेगळ्या राजकीय घडामोडी घडतील मात्र त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com