अविश्वसनीय! कोलकत्यात सीबीआय विरुद्ध पोलिस संघर्ष

वृत्तसंस्था
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

कोलकता : लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस विरुद्ध भाजप या राजकीय संघर्षाला आज (रविवार) रात्री चांगलीच धार आली आहे. चिट फंड गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी आलेल्या सीबीआयच्या अधिकार्‍यांना पश्चिम बंगालच्या पोलिसांनीच विरोध केला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालण्यास सुरवात केली आहे.

या घटनेचे राजकीय पडसादही तातडीने उमटले. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधून 'राजकीय संघर्षात तुमच्याबरोबर आहोत' अशी ग्वाही दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये चिट फंड गैरव्यवहाराची पाळेमुळे खोलवर गेली आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे एक पथक कोलकत्यामध्ये दाखल झाले होते. कोलकत्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी आलेल्या या पथकातील अधिकार्‍यांनाच पोलिसांनी अटक केली. त्यानंतर राज्यात राजकीय संघर्ष सुरू झाला.

रविवारी रात्री आठच्या सुमारास या सर्व प्रकरणास सुरवात झाली. कोलकत्याच्या पोलिसांनी सीबीआयच्या अधिकार्‍यांना पकडून नेल्याची दृष्ये टीव्हीवर झळकल्यानंतर देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. ममता बॅनर्जीही तातडीने पोलिस आयुक्तांच्या निवासस्थानी दाखल झाल्या.

या वेगवान घडामोडींनंतर सीबीआयच्या कार्यालयालाही पोलिसांनी वेढा दिला आहे. 

'भाजपविरोधात भाषणे केली, म्हणून आता केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे', असा आरोप बॅनर्जी यांनी केला. यानंतर केंद्र सरकारच्या कारवाईच्या निषेधार्थ बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरू केले.

न्यायालयाच्या आदेशानुसार या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पाच अधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे संतप्त झालेल्या सीबीआयनेही आता उद्या (सोमवार) सकाळी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची दाट शक्यता आहे.

'मोदी सरकारने कोलकता पोलिस आयुक्तांच्या घरी सीबीआयचे अधिकारी पाठविले. त्यांच्याकडे कोणतेही सर्च वॉरंट नव्हते. मोदी, अमित शहा आणि अजित डोवाल यांच्या सूचनांनुसार ही कारवाई सुरू आहे', असा आरोप तृणमूल कॉंग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केला.

आमच्याकडे सबळ पुरावे आहेत!
कोलकत्याचे पोलिस आयुक्त कुमार यांच्याविरोधात आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. चिट फंड गैरव्यवहाराचे पुरावे नष्ट करण्यात त्यांची भूमिका होती. आताही सीबीआयची कारवाई रोखून आमच्या ताब्यातील कागदपत्रे नष्ट करण्याचा त्यांचा डाव आहे, असा दावा सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांनी केला. पोलिस विरुद्ध सीबीआय या संघर्षामध्ये आता सीआरपीएफलाही पाचारण करण्यात आले आहे. चिट फंडच्या गैरव्यवहारांचे पुरावे आणि सीबीआयच्या कार्यालयांची सुरक्षा करण्यासाठी सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्याची विनंती राव यांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolkata police-CBI face off during chit fund scam