Mountain Man : गावकऱ्यांनी टेकडी खोदून बनविला रस्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mountain Man

Mountain Man : गावकऱ्यांनी टेकडी खोदून बनविला रस्ता

कोरापूत (ओडिशा) : बिहारमधील ‘माउंटन मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दशरथ मांझी या कामगाराने हातोडा व छिन्नीने टेकडी खोदत रस्ता बनविला होता. त्याच्या या अनोख्या संघर्षावर ‘मांझी-द माउंटन मॅन’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. ओडिशात याच घटनेसारख्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. राज्यातील कोरापूत जिल्ह्यातील घंटरागुडात आदिवासींनी टेकडी खोदून रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. स्वत:ची दळणवळणाची समस्या दूर करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

आदिवासी स्त्री-पुरुषांनी टेकडी खोदून झुडुपे साफ करत थोडाथोडका नव्हे तर सहा कि.मी.चा कच्चा रस्ता तयार केला आहे. हा रस्ता घंटागुडाला कोरापूत जिल्ह्यातील पुकी चकशी जोडतो. ओडिशाच्या दक्षिणेला असलेल्या कोरापूत शहरापासून घंटरागुडा ३५ कि.मी.वर आहे. प्रशासनाने १५ वर्षांपूर्वी धातूचा रस्ता बनविला होता. मात्र, त्याची देखभाल न केल्यामुळे रस्त्याचे कोणताही भाग आता शिल्लक नाही. त्यामुळे, घंटरागुडाहून कोरापूतला थेट रस्ता नसल्याने गावकऱ्यांना तब्बल ५२.कि.मी.चा वळसा घालून कोरापूतला जावे लागत होते.

विविध कामांसाठी जिल्हा मुख्यालयात जावे लागत असल्याने गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यामुळे, त्यांनी कमी अंतराचा रस्ता तयार करून देण्याची विनंती प्रशासनाला केली. मात्र, अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याने शेवटी आदिवासी गावकऱ्यांनी स्वत:च हा रस्ता तयार करण्याचे ठरविले. त्यानंतर, शेतीकामाची कुदळ, विळा, चाकूसारखी अवजारांच्या मदतीने त्यांनी टेकडी खोदून रस्ता तयार करण्यास सुरुवात केली.

या नवीन रस्त्यामुळे घंटरागुडासह नऊ गावांतील चार हजार गावकऱ्यांची सोय झाल्याचाही घंटरागुडाच्या गावकऱ्यांचा दावा आहे. ग्रामीण संपर्क कार्यक्रमात घंटरागुडाचा समावेश करण्यात आला असून गावापर्यंत लवकरच पक्का रस्ता बांधण्यात येईल, असे गटविकास अधिकारी डंबुरूधर मलिक यांनी सांगितले.

आमच्या गावावरून कोरापूतला लांबच्या रस्त्याने जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. विशेषत: रात्री तसेच पावसाळ्यात खूप त्रास व्हायचा. गावातील रूग्णाला कोरापूतमधील रूग्णालयात हलविणे तर दिव्यच होते. आमच्या गावावरून कोरापूत जिल्हा मुख्यालयापर्यंत कमी अंतराचा रस्ता बनविण्याची विनंती आम्ही अनेकवेळा प्रशासनाला केली. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे, अखेर आम्ही स्वत:च रस्ता बनविण्याचा निर्णय घेतला.

- लाचना पुरसेठी, गावकरी