esakal | कुंभमेळ्यातील आणखी एका आखाडा प्रमुखाला कोरोनाची बाधा; याआधी एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभमेळ्यातील आणखी एका आखाडा प्रमुखाला कोरोनाची बाधा; याआधी एकाचा मृत्यू

कुंभमेळ्यातील आणखी एका आखाडा प्रमुखाला कोरोनाची बाधा; याआधी एकाचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

देहरादून : हरिद्वारमध्ये सुरु असलेला कुंभमेळा आता कोरोना विषाणूसाठीचा हॉटस्पॉट बनला आहे. देशात कोरोनाची इतकी मोठी महाभयंकर साथ असताना अशाप्रकारच्या मेळ्याच्या आयोजनाला प्रशासनाने परवानगी दिलीच कशी, असा सवाल आता उपस्थित होत आहे. या कुंभमेळ्यामध्ये आता मध्य प्रदेशहून आलेले निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर निरंजनी आखाड्याचे रविंद्र पुरी हे देखील कोरोना संक्रमित आढळले आहेत. याआधी त्यांनी आपल्या एका टि्वटमध्ये म्हटलं होतं की, कुंभमेळ्यात कोविड-19 ची बिघडती परिस्थिती पाहता आमच्या दृष्टीने या आयोजनाचे समापन झाले आहे. मुख्य शाही स्नान संपुष्टात आलं आहे. आमच्या आखाड्यातील अनेक लोकांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. मेळ्यात अनेक साधून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा: नाशिक-पुणे रेल्वेमार्ग प्रकल्पात राज्य सरकारचा ५० टक्के वाटा!

कोरोनामुळे आखाड्यांची माघार

कुंभमेळ्यातील कोरोना महामारीचा धोका पाहता प्रमुख 13 आखाड्यांपैकी दोन निरंजनी आखाडा आणि तपोनिधी श्री आनंद आखाडाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही आखाड्यांनी कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीचे कारण देत माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही आखाडे 17 एप्रिलला कुंभमेळ्याला निरोप देतील.

आखाडा प्रमुखाचं कोरोनाने निधन

तर दुसरीकडे, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्यावर देखील ऋषिकेश येथील एम्समध्ये उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे तर निर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी कपिल देव यांचे उपचारादरम्यान एका खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

हेही वाचा: पुणे : २४ तासात कोरोनाने घेतले शंभराहून अधिक बळी

गुरुवारी उत्तराखंडमध्ये आढळले 2220 नवे रुग्ण

काल गुरुवारी उत्तराखंडमध्ये कोरोनाचे तब्बल 2220 नवे रुग्ण आढळून आले. राज्यात एका दिवसात आढळणारा हा सर्वाधिक आकडा आहे. आणि आता हे संकट तीव्र झालेलं असताना कुंभमेळ्यातील आयोजनाच्या कालावधीत कपात करण्यात आली आहे. इतरवेळी 12 वर्षांच्या अंतराने होणारा कुंभमेळा सुमारे 4 महिन्यांपर्यंत सुरु असतो. मात्र, आता कोरोना संकटामुळे यावेळी आयोजन 1 एप्रिल ते 30 एप्रिलदरम्यान होत आहे. हरिद्वार कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा अतिआत्मविश्वास

गेल्या वर्षी तबलिगी जमातच्या मरकजमुळे कोरोना पसरल्याचा आरोप मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होता. त्याचप्रमाणे यंदा कुंभमेळ्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी सरळसरळ धुडकावून लावलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, कुंभमेळा आणि मरकज यांनी तुलना करू नये. कुंभमेळा एका विस्तीर्ण अशा मोकळ्या जागेत होत आहे. पण मरकज हे एका बंद इमारतीत झालं होतं, असं रावत म्हणाले होते. एकप्रकारे त्यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत ना हरकत प्रमाणपत्रच या वक्तव्यातून दिलं होतं. मात्र, आता हाच गाफीलपणा आणि अतिआत्मविश्वास नडताना दिसून येत आहे.

loading image