

Kuno Cheetah
esakal
भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट चित्ता’ला चार वर्षे पूर्ण होत असतानाच मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतात जन्मलेल्या मादी चित्ता KGP-12 हिने चार निरोगी बछड्यांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, हे तिचे दुसरे मातृत्व आहे. या नव्या जन्मामुळे देशातील चित्त्यांची एकूण संख्या ५६ वर पोहोचली आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवजात बछड्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली.
१७ सप्टेंबर २०२२ रोजी नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतूनही चित्ते भारतात आणण्यात आले. या चार वर्षांच्या कालावधीत कुनोमध्ये चित्त्यांच्या संख्येत वाढ झाली असून भारतात जन्मलेल्या बछड्यांची संख्या आता ३६ वर पोहोचली आहे.
देशातील ५६ चित्त्यांपैकी तीन चित्ते सध्या मंदसौरमधील गांधीसागर अभयारण्यात आहेत, तर उर्वरित चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये आहेत.
KGP-12 ही दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या ‘गामिनी’ या मादी चित्त्याच्या पोटी कुनोमध्ये जन्मलेली आहे. यापूर्वी ११ एप्रिल रोजी KGP-12 ने चार बछड्यांना जन्म दिला होता. मात्र, १२ मे रोजी या चारही बछड्यांचा मृत्यू झाला होता. बिबट्याच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती.
या घटनेनंतर आता KGP-12 ने पुन्हा चार बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे भारतात जन्मलेली चित्त्यांची पुढील पिढी आकार घेत असल्याचे चित्र आहे.
कुनो नॅशनल पार्कचे मुख्य वनसंरक्षक उत्तम शर्मा यांच्या माहितीनुसार, भारतात जन्मलेली नामिबियन वंशाची मादी ‘मुखी’ हिने २० नोव्हेंबर २०२५ रोजी पाच बछड्यांना जन्म दिला होता. आता दक्षिण आफ्रिकन वंशाच्या KGP-12 ने चार बछड्यांना जन्म दिल्याने भारतात जन्मलेल्या चित्त्यांची पुढील पिढी वाढताना दिसत आहे.
चित्त्यांच्या वैज्ञानिक नोंदी आणि ट्रॅकिंगसाठी त्यांच्या नावांमध्ये विशिष्ट कोडिंग पद्धतीचा वापर केला जातो. KGP-12 मधील ‘K’ म्हणजे Kuno, ‘G’ म्हणजे Gamini, तर ‘P’ म्हणजे Progeny किंवा Pup. ‘१२’ हा गामिनीच्या वंशावळीतील संबंधित अपत्याचा क्रम दर्शवतो.
KGP-12 ने या चार बछड्यांना संरक्षित मोठ्या बाड्यात जन्म दिला आहे. सध्या चारही बछड्यांची प्रकृती चांगली असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. विशेष पथक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या हालचालींवर २४ तास लक्ष ठेवत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.