लडाख सीमेवर तणाव वाढणार; चीनचा सामना कऱण्यासाठी भारताची रणनीती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यानच्या ताबा रेषेवर निर्माण झालेला तणाव लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. भारतीय जवानांना हिवाळ्यामध्येही या भागांत अधिक सावध राहावे लागणार आहे.

नवी दिल्ली - लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यानच्या ताबा रेषेवर निर्माण झालेला तणाव लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. भारतीय जवानांना हिवाळ्यामध्येही या भागांत अधिक सावध राहावे लागणार असून देपसांग भागामध्ये भारतीय लष्कराकडून युद्धपातळीवर भूजलाचा शोध घेतला जात आहे. दौलत बेग ओल्डी आणि देपसांग परिसरामध्ये यासाठी वेगळी शोधमोहीम राबविली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही सैनिक आणि भूजलतज्ज्ञ हे या मोहिमेवर काम करत आहेत.

चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने अन्य देशांकडून शस्त्र खरेदीला वेग दिला असून देशांतर्गत देखील मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती केली जात आहे. आत्मनिर्भर मोहिमेअंतर्गत आता देशामध्येच ‘प्रॉपल्ड एअर डिफेन्स गन मिसाईल सिस्टिम’ आणि ‘क्लोज क्वार्टर कार्बाईन’ची निर्मिती करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने यासाठी अन्य देशांसोबत झालेले ३ अब्ज डॉलरचे करार रद्द केले आहेत. मागील अनेक वर्षांपासून या ना त्या कारणाने हे करार पुढे ढकलण्यात येत होते.

दोन्ही देशांदरम्यान गोळीबार
भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची मॉस्कोमध्ये भेट होण्याआधी उभय देशांमध्ये ताबारेषेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. चीनच्या सैन्याने २९ आणि ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पँगाँग सरोवराच्या परिसरामध्ये उत्तर भागात भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचाही प्रयत्न केला होता. याच भागाला लागून असलेल्या फिंगर-३ आणि ४ या डोंगराळ भागाला जोडणाऱ्या सीमारेषेवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी बंदुकीच्या शंभर ते दोनशे फैरी झाडल्या होत्या, असे इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मागील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच ही घटना घडल्याचे बोलले जाते. येथील चुशूल सेक्टरमध्ये अनेक भागांत तैनात भारत आणि चीनच्या लष्करातील अंतर हे केवळ तीनशे मीटर एवढे आहे. यामुळे भविष्यामध्ये हा तणाव आणखी वाढू शकतो. 

हे वाचा - सीमा बदलण्याचा ‘ड्रॅगन’चा प्रयत्न

गेल्या 20 दिवसात तीनवेळा गोळीबार
लडाखच्या पूर्व भागातील गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यातील सीमा विवाद एप्रिल महिन्याच्या मध्यापासून सुरु झाला. यानंतर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक, प्रशाकीय आणि सैन्य अधिकाऱ्यांमध्ये अनेक वेळा चर्चेच्या फैऱ्या झडल्या. मात्र त्यानंतर देखील दोन्ही देशांमधील तणाव निवळलेला नाही. मागील काही दिवसांपूर्वी भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तब्बल चार दशकांनी बंदुकीच्या गोळ्या झाडल्या गेल्या. त्यानंतर आता भारत व चीन सीमा विवादातून गेल्या 20 दिवसांत किमान तीन वेळा गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ladakh fight against china lac india soldire searching water in depsang winter situation