
"धमकी दिली नसती तर..."; लखीमपूर खेरी प्रकरणी कोर्टाने मंत्र्याला फटकारलं
लखीमपूर खेरी : उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने मागच्या वर्षी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांची हत्या घडवून आणली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. अलाहाबाद हायकोर्टाने आता त्याच्यासहीत चौघांचा जामीन फेटाळला आहे.
दरम्यान अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याचा जामीन फेटाळून लावताना कोर्टाने मंत्री अजय मिश्रा यांना फटकारलं आहे. "घटनेच्या आदल्या दिवशीच्या भाषणात शेतकऱ्यांना धमकी द्यायला नव्हती पाहिजे. धमकी दिली नसती तर ही घटना घडली नसती." असं म्हणत उच्च न्यायालयाने फटकारलं आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या विशेष तपास पथकाने सादर केलेल्या चार्जशीटमध्ये म्हटलंय की, "मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या अजय मिश्रा यांनी धमक्या दिल्या नसत्या तर ही हत्या घडली नसती." असा आरोप तपास पथकाने केला असून उच्च न्यायालयाने जामीन फेटाळून लावला आहे.
हेही वाचा: रुपया कोमात, डॉलर जोमात; भारतीय चलनाची आत्तापर्यंतची सर्वांत मोठी घसरण
मागच्या वर्षी ३ ऑक्टोबरला आशिष मिश्रा याने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर आणि पत्रकारांवर गाडी घातली होती. त्यामध्ये चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता तर नंतर उसळलेल्या हिंसेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. अशा एकूण सात शेतकऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला होता. ही घटना घडण्याच्या काही काळ आधी आशिष मिश्रा हा त्याच्या वडलांच्या सभेत सहभागी होता. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत ते उपस्थित होते. त्या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. त्यामुळे या वादाला तोंड फुटले होते.
हेही वाचा: SCच्या 2 नव्या न्यायाधीशांचा शपथविधी; 30 महिन्याच्या प्रतिक्षेनंतर जागा भरल्या
ही घटना घडण्याच्या आदल्या दिवशीच्या भाषणात अजय मिश्रा यांनी म्हटलं होतं की, "शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं नाहीतर आम्ही दोन मिनीटात याचं निराकरण करु." अशी धमकी त्यांनी शेतकऱ्यांना दिली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचं आंदोलन नेटाने चालू ठेवलं होतं. याच कारणामुळे दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडल्याचं तपास पथकाने कोर्टासमोर सांगितलं. त्यानंतर कोर्टाने आशिष मिश्रा आणि त्याच्या सोबतच्या चार जणांचा जामीन फेटाळला आहे.
Web Title: Lakhimpur Kheri Farmer Murder Case Union Minister Mishra Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..