esakal | 'मोदीजी, लखीमपूरला जा; संपूर्ण देश तो व्हिडीओ पाहतोय' : केजरीवाल
sakal

बोलून बातमी शोधा

'मोदीजी, लखीमपूरला जा; संपूर्ण देश तो व्हिडीओ पाहतोय' : केजरीवाल

'मोदीजी, लखीमपूरला जा; संपूर्ण देश तो व्हिडीओ पाहतोय' : केजरीवाल

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आता लखीमपूर घटनेबाबत सरकारला प्रश्न विचारलेत. त्यांनी एक व्हिडीओ जाहीर करुन आपली भूमिका मांडून सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, लखीमपूर घटना संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी बघत असताना सरकार हे प्रकरण का दाबू इच्छित आहे? स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव एकीकडे सुरु असताना दुसरीकडे अशी दडपशाही सुरुये, हे तर ब्रिटीशांकडून व्हायचं... तुम्ही गप्प का आहात? असा प्रश्न केजरीवालांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे.

केजरीवाल यांनी म्हटलंय की, आतापर्यंत हत्या करणाऱ्यांना का अटक करण्यात आलेली नाहीये? तुमची काय मजबूरी आहे? त्यांना वाचवलं का जातंय? आरोपींनी दिवसाढवळ्या एवढ्या गर्दीसमोर शेतकऱ्यांना चिरडून टाकलं. तरिही आरोपींना अटक का नाही झाली? संपूर्ण यंत्रणा त्या आरोपीसमोर गुडघे टेकून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतेय, असं फक्त हिंदी चित्रपटात पाहिलं होतं. पंतप्रधान मोदीजी, आज संपूर्ण देश तो व्हिडीओ सगळीकडे पाहतोय की एक गाडी आली आणि तिने शेतकऱ्यांना चिरडलं. ज्या प्रकारे संपूर्ण सरकार गप्प आहे. तुम्ही गप्प आहात, त्यातून काय संदेश देत आहात तुम्ही? असा सवाल त्यांनी केलाय.

पुढे ते म्हणाले की, तुम्ही नेता आहात, श्रीमंत आहात म्हणजे तुम्ही कुणालाही चिरडू शकता, असं सांगायचंय का? त्या गाडीने फक्त त्या शेतकऱ्यांना नव्हे तर देशातील सर्व शेतकऱ्यांना, गरिबांना चिरडलं आहे. असं वाटतंय की त्या गाडीने संपूर्ण सरकारला आणि यंत्रणेलाच चिरडून टाकलंय. एका बाजूला तुम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना चिरडलं जातंय. तिथे विरोधकांना जाऊ दिलं जात नाहीये. त्यांना अटक केली जात आहे. हा कोणत्या स्वांतत्र्याचा महोत्सव आहे? हा प्रकार तर ब्रिटीश करायचे.. अशी कोणती गोष्ट आहे जी लपवली जातेय. तिथे कुणालाच जाऊ दिलं जात नाहीये. जे जाताहेत त्यांना अटक केली जातेय. गेल्या एक वर्षांपासून शेतकरी सीमेवर बसलेत. शेतकऱ्यांचा एवढा द्वेष का? आज यंत्रणेतील लोक म्हणताहेत की त्या गाडीत मंत्र्याचा मुलगा नव्हता. आणखी आठवड्याने म्हणतील की तिथे गाडी नव्हतीच. नंतर म्हणतील की, हत्या झालीच नाही. त्यामुळे तुम्ही लखीमपूर जा, तिथे पीडितांच्या नातेवाईकांना भेटा. जे आरोपी आहेत त्यांना अटक करा आणि त्या मंत्र्यांना बरखास्त करा, अशी विनंती त्यांनी केलीय.

loading image
go to top