अश्रू ढाळणारे मोदी चिरडून ठार केलेल्या शेतकऱ्यांविषयी शांत का?

अश्रू ढाळणारे मोदी चिरडून ठार केलेल्या शेतकऱ्यांविषयी शांत का?

lakhimpur kheri violence : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात आंदोलक शेतकऱ्यांवर भरधाव गाडी घालून त्यांना चिरडून मारण्याचा निर्घृण प्रकार घडला. आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कमालीचे संवेदनशील तसेच भावनाशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना मानवता आणि गरीबांच्या हक्कांविषयी कळवळा आहे. त्यामुळेच अनेकदा पंतप्रधान मोदी हे जाहीरपणे अश्रू ढाळताना जगाने पाहिले आहे. त्या संवेदनशील मोदी यांनी चिरडून ठार केलेल्या शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करू नयेत याचे आश्चर्य वाटते. कुत्र्याचे पिल्लू गाडीखाली आले तर ते मरणारच, त्याविषयी किती दुःख व्यक्त करायचे? पण योगींच्या राज्यात चार शेतकरी गाडीखाली आले व त्यांना ठार केले गेले. चार शेतकऱ्यांच्या हत्येने आंदोलन पेटले. त्यातून हिंसाचार घडला. एकूण आठजणांना त्यात प्राण गमवावा लागला. याचा धक्का संवेदनशील दिल्लीस बसू नये? असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील भाजप नेते मराठवाडा, विदर्भातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर पोहोचले तेव्हा त्यांना कोणी रोखले नाही, पण उत्तर प्रदेशात शेतकरी चिरडून मारले गेले. शेतकऱ्यांना मारायचे व राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करायची ही कसली लोकशाही? केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने केलेला हा अपराध दुसऱ्या एखाद्या राज्यात घडला असता तर भाजपने देश डोक्यावर घेतला असता. आता शेतकऱ्यांनाच गुन्हेगार, अराजकवादी ठरविण्यासाठी आटापिटा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचे रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अमली पदार्थांची व्यसने आणि थेरं कुणाला महत्त्वाची वाटत असतील तर ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं, असा टीकेचा बाणही शिवसेनेनं सोडला आहे.

शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने भरधाव गाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसवून शेतकऱ्यांना ठार केले. त्यामुळे आंदोलक भडकले व हिंसाचार झाला. इतके मोठे मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुख खानच्या मुलाने 13 ग्रॅम ड्रग्ज घेतल्याच्या बातम्यांचा पाठलाग करीत आहे. उत्तर प्रदेशात मंत्रीपुत्राने चार शेतकरी चिरडून मारले, यापेक्षा शाहरुख खानच्या पोराचे प्रताप या मंडळींना महत्त्वाचे वाटतात. शाहरुख खानचा मुलगा व त्याच्या नशेबाज मित्रमंडळींचे कृत्य हा श्रीमंतांचा माज आहे. त्यांच्यावर कायद्याने कठोरात कठोर कारवाई होईलल, असा विश्वासही व्यक्त केलाय.

लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांच्या हत्यांनी देश हादरला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशच्या रामभूमीवर चिरडण्यात आले. ज्या भूमीवर शेतकरी दोन वर्षांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत, त्यांचा आक्रोश ऐकायला सरकार तयार नाही. गाझीपूरच्या सीमेवर लोखंडी पिंजरे चारही बाजूंनी उभे करून शेतकऱ्यांना बंदिवान बनवून ठेवले. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. अश्रुधूर, लाठय़ा चालविल्या गेल्या. हरयाणात गोळीबार करण्यात आला आणि तेही कमी पडले तेव्हा त्यांच्यावर भरधाव गाडय़ा चढवून चिरडून मारले. या बातमीची आग मीडियाच्या छोटय़ा पडद्यावर आणि वृत्तपत्रांच्या कागदावर पेटलेली दिसली नाही. उलट शेतकऱ्यांना दोष देण्याचे काम सुरू आहे. ‘लखीमपूर खेरी’ने देशाची मान शरमेने खाली गेली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चढवून ठार करतो, त्याच वेळी हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर हे भाजप कार्यकर्त्यांना शेतकरी आंदोलकांना जशास तसे उत्तर द्या, असे सांगून हिंसेसाठी उत्तेजन देतात. एका राज्याचा मुख्यमंत्रीच शेतकऱ्यांविरुद्ध हिंसाचारास प्रोत्साहन देत असेल तर तेथील राज्यपालांनी ते शासन बरखास्त करण्याची शिफारस तत्काळ करायला हवी. प. बंगाल, महाराष्ट्रातील राज्यपाल याच पद्धतीने काम करतात. मग त्यांचाच कित्ता हरयाणा, उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी का गिरवू नये? लखीमपूर खेरीतले वातावरण तापले आहे व त्या जिल्ह्यांच्या सीमा आज योगी सरकारने सील केल्या. प्रियंका गांधी शेतकऱ्यांचे हत्याकांड झाले तेथे जाण्यासाठी निघाल्या, त्यांना योगी सरकारने अटक केली. अटक करताना असभ्य वर्तन केले. खासदार हुड्डा यांना धक्काबुक्की केली. हे काय चालले आहे? अखिलेश यादव यांनाही कोंडून ठेवले आहे. इतका कडेकोट बंदोबस्त करण्यापेक्षा सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य का करीत नाही? त्यांचे म्हणणे का ऐकत नाही? शेतकरी ठार मेला तरी चालेल, पण सरकार एक इंचही मागे हटणार नाही, हा ताठा व बाणा स्वकियांविरुद्ध जितका आहे, तितका परकीय आक्रमकांविरुद्ध दिसत नाही, अशी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com