स्वराज यांच्या जाण्याने अडवानी निःशब्द

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 7 August 2019

आपले जिवाभावाचे मित्र अटलबिहारी वाजपेयी यांचा वियोग, काही महिन्यांपूर्वीच सहन करणारे अडवानी स्वराज यांच्या अचानक जाण्याने आणखी नि:शब्द झाले. सकाळी त्यांनी एका छोट्याशा निवेदनाद्वारे आपल्या मनातील शोकभावना व्यक्त केल्या.

नवी दिल्ली : सुषमा स्वराज यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय राजकारणातील एक उमदे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. सुषमा यांचे निधन हे माझ्यासाठी व्यक्तिगत मोठे नुकसान आहे, अशा शब्दांमध्ये भिष्माचार्य लालकृष्ण अडवाणी यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे.

1977 मधील जे. पी आंदोलनापासून आणि त्यानंतर केंद्रात दोनदा मंत्री आणि दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून विविध पदे भूषवणाऱ्या स्वराज यांची राजकीय कारकीर्द अतिशय जवळून आणि एका वडीलधाऱ्यांच्या नजरेने पाहणारे आणि अनुभवणारे अडवानी यांना वर्षभरात आपले अतिशय जवळचे माणूस गेल्याचा दुसरा धक्का बसला आहे. भारतरत्न आणि आपले जिवाभावाचे मित्र अटलबिहारी वाजपेयी यांचा वियोग, काही महिन्यांपूर्वीच सहन करणारे अडवानी स्वराज यांच्या अचानक जाण्याने आणखी नि:शब्द झाले. सकाळी त्यांनी एका छोट्याशा निवेदनाद्वारे आपल्या मनातील शोकभावना व्यक्त केल्या.

सुषमा स्वराज या विद्यार्थीदशेपासूनच एक प्रभावी वक्त्या आणि कार्यकर्त्या होत्या असे सांगून अडवाणींनी म्हटले आहे की त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात विचारसरणी बरोबर कधीही तडजोड केली नाही. त्या एक अत्यंत कुशल संघटक होत्या. त्यांचे जाणे हा माझ्या व्यक्तिगत जीवनातील अत्यंत शोकाकुल क्षण आहे. त्यांनी जबाबदारी सांभाळली ती त्याने पार पाडली आणि त्यावर  अमीट छाप सोडली असे अडवाणी यांनी म्हटले आहे.

चॉकलेट केक आणि मफिंस!
भाजपमध्ये मोदी युग सुरू झाल्यापासून अडवानी यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या अनेक नेत्यांनी एका झटक्यात पारडे बदलले. एकमेव आणि खणखणीत अपवाद स्वराज यांचा होता. मी अडवानी यांची पाठराखण, साथ कधी सोडली नाही आणि लपवलीही नाही. यांच्या वाढदिवशी दरवर्षी आवडणारा चॉकलेट केक घेऊन स्वराज यांच्या घरी आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचत असत. स्वराज यांनी अडवानींना छोटे केक म्हणजेच मफिंस प्रचंड आवडत असल्याचे आठवण, सकाळ शी बोलतानाही सांगितली होती.  स्वराज यांच्या चॉकलेट केक ची आठवण अडवाणी यांनीही आपल्या शोकसंदेशात जागविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lal Krishna Advani gets emotional on Sushma Swaraj death