Bihar Election : प्रचारात उतरल्या ऐश्वर्या राय; जेडीयूला समर्थन देत वडीलांसाठी केला प्रचार

Bihar Election
Bihar Election

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता तेज प्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्या राय यादेखील सामील झाली आहे. शुक्रवारी ऐश्वर्या यांनी आपल्या वडीलांसाठी प्रचार केला. त्यांचे वडील चंद्रीका राय हे सारण जिल्ह्यातील परसा विधानसभा मतदारसंघातून जेडीयूच्या जागेवरुन निवडणूक लढवत आहेत. या प्रचारादरम्यान अगदी नेत्यांप्रमाणे हात जोडून त्या मत मागत होत्या. त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा हवाला देत लोकांना जेडीयूलाच मत देण्याची विनंती केली.  

मोठ्या संख्येने लोक उपस्थित
ऐश्वर्या यांच्या या रोड शोमध्ये लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. ऐश्वर्या यांनी या गर्दीला आपल्यावर झालेल्या अन्यायाचा हवाला देत मत देण्याची विनंती केली. त्यांनी म्हटलं. मी माझ्या वडिलासांठी आपल्या सर्वांकडे मत मागण्यासाठी आलेली आहे. ही  परसा विधानसभा क्षेत्राच्या मान-सन्मानाची बाब आहे. ऐश्वर्या राय दरियापूरहून निघून दरिहारा, टरवा अशा अनेक गावांत रोड शो करत होत्या. यादरम्यान त्यांनी असा दावा केला की, त्यांचे वडील चंद्रीका राय परसा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी होतील. त्यांनी म्हटलं की परसाची जनता 10 नोव्हेंबर रोजी आपल्या अपमानाचा बदला घेईल. 

नितीश कुमारांचा घेतला आशीर्वाद
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत एका प्रचारसभेत भाषण केलं होतं. त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला होता. तेंव्हापासूनच असा अंदाज वर्तवला जात आहे की त्या कदाचित राजकारणात येणार आहेत. त्यांनी या सभेत लोकांना संबोधित करताना नितीश यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांना मत देण्याचे आवाहन लोकांना केले होते. नितीश कुमार यांनी देखील तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाचा उल्लेख करत म्हटलं होतं की एका सुशिक्षित मुलीसोबत असा दुर्व्यवहार केला गेला.

कोर्टात प्रलंबित आहे घटस्फोट
ऐश्वर्याचे पती तेजप्रताप यादव यावेळी हसनपुर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या दरम्यान घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. सासरहून आपल्या माहेरी आल्यानंतर ऐश्वर्या सतत सार्वजनिक कार्यक्रमांपासून लांब राहत होत्या. मात्र आता त्या थेट प्रचारात उतरुन जेडीयूचाच प्रचार करत आहेत. त्यांचे वडील आधी राजदकडून याच मतदारसंघात आमदार होते. मात्र, या घटस्फोटाच्या प्रकरणामुळे यादव परिवारासोबत त्यांचे नातेसंबंध बिघडले होते. मात्र आता ते राजदला रामराम ठोकत याच जागेवरुन जेडीयू पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.  

बिहार विधानसभेच्या निवडणुका तीन टप्प्यात होत असून यातील पहिला टप्पा पार पडला आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यासाठी 3 व 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com