दिवाळीआधी Good News! इजिप्त, भुतानहून आलेल्या कांदे-बटाटेंमुळे कमी होणार महागाई

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काल शुक्रवारी म्हटलंय की कांदे आणि बटाट्यांचा घरगुती पुरवठा वाढवण्यासाठी आणि वाढत्या किंमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी  सरकारकडून पावलं उचलली जात आहेत.

नवी दिल्ली : वाणीज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल शुक्रवारी म्हटलंय की कांदे आणि बटाट्यांचा घरगुती पुरवठा वाढवण्यासाठी आणि वाढत्या किंमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी  सरकारकडून पावलं उचलली जात आहेत. त्यांनी म्हटलं की, खासगी व्यापाऱ्यांनी आधीच सात  हजार टन कांद्याची आयात केली आहे तर 25 हजार टन कांदा दिवाळीच्या आधी येणार आहे. त्यांनी केलेलं हे वक्तव्य महत्वपूर्ण मानलं जात आहे कारण सध्या कांद्याचे भाव 80 रुपये किलोवर पोहोचले आहेत. तर बटाट्याची किंमत सध्या 60 रुपयांहून अधिक आहे. 

गोयल यांनी म्हटलं की सहकारी एंजेसी नाफेडदेखील कांद्यांची आयात करेल. यामुळे बाजारात कांद्यांचा आवश्यक तो पुरवठा होईल. केवळ कांदाच नाही तर जवळपास 10 लाख टन बटाटा देखील आयात केला जात आहे. यासाठी लागणारे सीमाशुल्क जानेवारी 2021 पर्यंत कमी करुन 10 टक्के केलं गेलं आहे. जवळपास 30 हजार टन बटाटा भूटानमधून येत्या काही दिवसांतच येणार आहे. 

हेही वाचा - पुलवामा हल्ल्याचं विरोधकांनी घाणेरडं राजकारणं केलं; PM मोदींनी व्यक्त केलं दु:ख

गोयल यांनी ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या संमेलनात म्हटलं की कांदा आणि  बटाट्याचे भाव वाढत आहेत. मात्र स्थानिक पातळीवर पुरवठा वाढवण्यासाठी कांद्यांवर निर्यातबंदीसह इतर सक्रिय पावलं उचलल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या किंमती स्थिर आहेत. अखिल भारतीय पातळीवर गेल्या तीन दिवसांपासून कांद्याची किरकोळ किंमत 65 रुपये प्रतिकिलो आणि बटाटे 43 रुपये किलो राहिली आहे.

इजिप्त, अफगानिस्तानातून मागवला कांदा 
आम्ही या गोष्टीची खबरदारी घेत आहोत की, येत्या सणाच्या पार्श्वभूमीवर या साऱ्या वस्तू स्वस्तात उपलब्ध व्हाव्यात. सरकारने कांद्यांच्या आयातीसाठी पावलं उचलली आहेत. आतापर्यंत सात हजार टन कांदा आयात केला गेला असून अजून 25 हजार टन कांदा येण्याची आशा आहे. गोयल यांनी म्हटलं की, खासगी व्यापारी इजिप्त, अफगानिस्तान आणि तुर्कीसारख्या देशांतून आयात करत आहेत. सहकारी एजेंसी नाफेडदेखील आयात करत आहे.

हेही वाचा - Bihar Election - मोफत लसीच्या आश्वासनाने आचारसंहितेचा भंग झाला का? निवडणूक आयोगानं दिलं उत्तर

डाळींबाबत सरकारने घेतला हा निर्णय
डाळींबाबत गोयल यांनी म्हटलं की, डाळींचे भाव स्थिर आहेत. तसेच गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हे भाव कमी आहेत. घरगुती पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने चार लाख टन तूर डाळीच्या आयातीच्या वेळेची मर्यादा डिसेंबर पर्यंत वाढवली आहे. त्यांनी म्हटलं की, 1.5 लाख टन उडीद डाळीसाठी परवाना जाहीर केला आहे. मसूर डाळीवरदेखील दहा टक्के आयात शुल्क डिसेंबर अखेरपर्यंत तसेच राहिल. सरकारने दोन लाख टन तूर डाळीच्या आयातीसाठी मोझांबिक बरोबर पुढील पाच वर्षांसाठी सामंजस्य करार (एमओयू) वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सोबतच 2.5 लाख टन उडीद डाळीच्या आयातीसाठी मानम्यारहून पाच वर्षांसाठी सामंजस्य करार केला गेला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: piyush goyal said government to ensure adequate supply of potatoes onion before diwali