Himachal Pradesh : धोकादायक इमारती ढासळल्या; पावसाने १२२ वर्षाचा विक्रम मोडला

हिमाचलला भूस्खलनाचा फटका; रहिवासी सुरक्षितस्थळी
Himachal Pradesh
Himachal Pradeshsakal

सिमला : पावसाचा तडाखा आणि भूस्खलनाचे वाढते प्रकार पाहता हिमाचल सरकारने डोंगर उतारावर असलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाशांना अन्यत्र भागात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार कार्यवाही केली जात आहे.

यादरम्यान कुलू जिल्ह्यात अनी भागात आज सकाळी धोकादायक ठरलेल्या डोंगर उतारावर असलेल्या आठ इमारती पाहता पाहता जमीनदोस्त झाल्या. काही मिनिटात ढासळलेल्या इमारतींमुळे परिसरात धुळ पसरली आणि मातीचे ढिगारे उभे राहिले. सुदैवाने काही दिवसांपूर्वीच या इमारती रिकाम्या केल्याने जीवितहानी झाली नाही.

अनी भागातील कोसळलेल्या इमारतीत दुकाने, बँका आणि अन्य व्यावसायिक प्रतिष्ठानांचा समावेश होता. कुलूच्या नव्या बसस्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्ग-३०५ जवळ असलेल्या काही इमारतींना भेगा पडल्या होत्या.

त्यामुळे प्रशासनाने नोटिसा बजावून रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतरित केले होते. आज सकाळी अचानक रिकाम्या इमारतींतून आवाज आला आणि एकानंतर एक अशा आठ इमारती ढासळल्या. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळ पसरली. अग्निशमन आणि बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ढिगारे बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

सिमल्यात सर्वाधिक पाऊस

सिमल्यात आतापर्यंत २०१७ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसाने १२२ वर्षाचा विक्रम मोडला आहे. मंडी, सिमला आणि सोलन येथे गेल्या चोवीस तासात चार ठिकाणी ढगफुटी झाली आहे.

एकाच दिवसांत ११ जणांचा मृत्यू झाला असून १८ वाहनांची हानी झाली आहे. सिमल्यातील वाहतूक सुरक्षितेसाठी बंद केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून संवेदनशील भागात चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी हवाई पाहणी केली आणि नुकसानीचे आकलन केले होते.

हिमाचल प्रदेशाने यंदाच्या मॉन्सूनमध्ये दोन महिन्यांत तीन दिवस विक्रमी पावसाचा अनुभव घेतला आहे. पहिला पाऊस ९ आणि १० जुलै रोजी मंडी आणि कुलू जिल्ह्यात पडला. त्यानंतर सिमला आणि सोलन जिल्ह्यात १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्टला पावसाने विक्रमी हजेरी लावली.

सिमला शहराने मंगळवारी २२ ऑगस्टच्या रात्री मुसळधार पावसाचा मारा सहन केला. शहरात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आणि भूस्खलनाचे प्रकार घडले. या तिन्ही पावसाने हिमाचल प्रदेशची मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली.

मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्य सरकारने १६५.२२ कोटी रुपयांचे वाटप केले आहेत. यातील काही पैसा पूल, रस्ते आणि घराच्या डागडुजीसाठी वापरला जात आहे. या पावसामुळे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा त्यांनी दावा केला.

पालमपूर येथे पाऊस सुरूच

हिमाचलमधील बहुतांश भागात पाऊस हजेरी लावत असून प्रामुख्याने पालमपूर येथे आजही पावसाची नोंद झाली. बुधवार सायंकाळपासून ते आजपर्यंत १३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

नहान येथे ९३ मिलीमीटर, सिमला येथे ७९ मिलीमीटर, धर्मशाला येथे ७० मिलीमीटर आणि मंडी येथे ५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यांत पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनेत १२० जणांचा मृत्यू झाला. एकूण २३८ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण अद्याप बेपत्ता आहेत. याशिवाय राज्यभरातील ७०९ रस्ते बंद आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com