
Year Ender 2022 : लता मंगेशकर, राकेश झुनझुनवाला... 'या' पाच दिग्गजांनी घेतला अखेरचा श्वास
मुंबईः 2022 हे वर्ष अनेक मुद्द्यांनी गाजलं. महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर मोकळा श्वास घ्यायला मिळाला. उद्योगाची चाकं फिरु लागल्याने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. गुन्हेगारीच्या काही घटनांनी तर देशाला हादरवून सोडलं. यातच काही सोन्यासारखी माणसं या वर्षात आपल्याला कायमची सोडून गेली.
ज्यांनी राजकारण, समाजकारण, कला, उद्योग या क्षेत्रामध्ये संघर्ष करुन अस्तित्व निर्माण केलं; त्यांनी याच वर्षात या जगाचा निरोप घेतला. कुणी अकाली, कुणी वृद्धत्त्वाने तर कुणी अपघाताने गेलं.. ही माणसं आता पुन्हा कधीही दिसणार नाहीत. आपण गमावल्यापैकी दिग्गजांचा हा धावता आढावा...
1. लता मंगेशकर
चंद्र-सूर्य असेपर्यंत लतादीदींचा स्वर कानी पडेल, असं पु.लं. देशपांडे म्हणाले होते. त्या गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन या वर्षात झालं. २८ सप्टेंबर १९२९ रोजी जन्म घेतलेलेल्या लताददीदींचं निधन वर्षाच्या सुरुवातीला ६ फेब्रुवारी २०२२ रोजी झालं. लतादीदींनी ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये गाणी गायिली. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आणि दादासाहेब फाळके पुरस्कारासह कितीतरी मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले. 'मेरी आवाज ही पहचान हैं' हे शब्द भारतीय मनावर बिंबवून... मागे सात ते आठ हजार गाण्यांचा खजाना ठेवून त्या कायमच्या निघून गेल्या.
2. बप्पी लहिरी
ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांनी आपल्या जादुई आवाजाने हिंदी संगीतसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. याच वर्षात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. १६ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. २७ नोव्हेंबर १९५३ रोजी जन्मलेल्या लहिरींनी १९७३ मध्ये 'नन्हा शिकारी' चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीच पदार्पण केलं. बप्पी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले ते १९८२ ला. मिथुन चक्रवर्तीच्या डिस्को डान्सर चित्रपटामधून त्यांना गायक-संगीतकार म्हणून ओळख मिळाली.
3. राजू श्रीवास्तव
ज्यांनी देशाला स्टँडअप कॉमेडीची खऱ्या अर्थाने ओळख करुन दिली ते ज्येष्ठ अभिनेते राजू श्रीवास्तव यांनी या वर्षात अखेरचा निरोप घेतला. २१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी त्यांचं निधन झालं. १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते कोमात होते. मेंदूपर्यंत ऑक्सिजन न पोहोचल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
राजू यांनी छोट्याश्या भूमिकेपासून करिअरला सुरुवात केली. त्यांनी तेजाब, मैंने प्यार किया, बाजिगर या चित्रपटांमधून भूमिका केल्या. २००१ मध्ये आमदनी आठनी खर्चा रुपयामध्ये त्यांनी बाबा चिन चिन चू ही भीमिका निभावली. २००३ मध्ये प्रेम दिवानी, २००७ मध्ये बॉम्बे टू गोवा, २०१७ मध्ये टॉयलेटः एक प्रेम कथा या चित्रपटातून छोट्या भूमिकेत ते दिसले. यासह त्यांनी देशातले अनेक कॉमेडी शो गाजवले.
4. सायरस मिस्त्री
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला. ४ सप्टेंबर २०२२ रोजी पालघर जिल्ह्यातली सुर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला. ७० लाख रुपये किंमतीच्या त्या मर्सिडीच बेंझ जीएलसी या एसयूव्ही कारमध्ये सुरक्षेच्या सगळ्या सुविधा होत्या. मात्र वेग जास्त असल्याने कारला भीषण अपघात झाला. गाडीमध्ये चौघे जण होते. मागच्या सीटवर सायरस मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगिर दिनशा पंडोले होते तर जहांगिरचे भाऊ दरीस पंडोले आणि त्यांची पत्नी अनायता समोरच्या सीटवर होते. अनायता गाडी चालवत होत्या. कार भरधाव वेगात होती. तीन लेन असल्याने नेमक्या कोणत्या पुलावरुन जायचे, हे ठरवू न शकल्याने हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सायरस मिस्त्री यांचा जन्म ४ जुलै १९६८ रोजी भारतीय वंशाच्या आयरिश व्यापारी कुटुंबात झाला. टाटा समूहातील अंतर्गत वादामुळे त्यांना २०१६मध्ये पदावरुन हटवण्यात आले होते. त्यांचे वडील पालोनजी मिस्त्री हे मोठे उद्योगपती होते. याच वर्षात जून २०२२ मध्ये वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मीडिया रिपोर्टनुसार सायरस मिस्त्री यांच्याकडे २०१८ मध्ये साधारण ७० हजार कोटी रुपयांची संपत्ती होती. जगभरात त्यांची घरे आणि मालमत्ता असल्याचं सांगितलं जातं. परंतु सगळं मागे ठेवून सायरस मिस्त्री गेले.
5. राकेश झुनझुनवाला
शेअर मार्केटमधील बिग बुल, भारतातील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि ज्यांना शेअर मार्केटचे किंग म्हटलं जायचे त्या राकेश झुनझुनवाला यांचं १४ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झालं. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या ब्रिज कॅण्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
भारताचे वॉरेन बफे अशी राकेश झुनझुनवाला यांची ओळख होती. त्यांची नेटवर्ट ५ अब्ज अमेरिकन डॉलर असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येतं. फोर्ब्ज मासिकाच्या आकडेवारीनुसार राकेश झुनझुनवाला हे भारतातली ३६ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. त्यांनी अक्सा एअर, स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इन्शुरन्स या कंपन्या चालवल्या. त्यांना किडनीच्या आजाराने ग्रासलं होतं. त्यांच्या गुंतवणुकीच्या ट्रिक्समुळे कित्येकांची आयुष्य उजलळी. मात्र सर्व सोडून झुनझुनवाला या वर्षात गेले.