World Cup 2019 : लता दीदी म्हणतायत, 'धोनीजी निवृत्त होऊ नका'

वृत्तसंस्था
Thursday, 11 July 2019

सध्या क्रिकेट विश्वात धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू आहेत. विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी धोनी निवृत्त होणार? अशी चर्चा सुरू होती. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर धोनी चाहत्यांना धक्का देणार का? अशी चर्चा सुरु असताना लता दीदींनी धोनीला भावनिक साद घातली आहे.

मुंबई : गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती घेऊ नये, अशा आशयाचे ट्विट आज (गुरुवार) केले आहे.

सध्या क्रिकेट विश्वात धोनीच्या निवृत्तीविषयी चर्चा सुरू आहेत. विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी धोनी निवृत्त होणार? अशी चर्चा सुरू होती. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर धोनी चाहत्यांना धक्का देणार का? अशी चर्चा सुरु असताना लता दीदींनी धोनीला भावनिक साद घातली आहे. या विषयावर अजून कोणतेही अधिकृत वृत्त आलेले नाही. 

काल (बुधवार) न्यूझीलंडविरुद्धचा सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही कर्णधार विराट कोहलीने धोनीने निवृत्तीविषयी अजूनपर्यंत कोणतीही माहिती दिली नसल्याचे स्पष्ट केले. या चर्चेवर लता दीदींनीही ट्विटरवर आपले मत मांडत धोनीने निवृत्तीचा निर्णय घेऊ नये, असे म्हटले आहे. 

लता दीदींनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ''नमस्कार एम.एस. धोनीजी, तुम्ही निवृत्ती घेण्याचा विचार करत आहात, असे ऐकायला मिळत आहे. कृपया तुम्ही असा विचार करू नका. देशाला तुमच्यासारख्या खेळाडूची गरज आहे. मला वाटते की, निवृत्तीचा विचारच तुम्ही करू नये. काल भलेही आपण जिंकू शकलो नसेल, पण आपण हरलेलो नाही.'' 

लता दीदींनी प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर लिहिलेले एक गाणेही भारतीय संघाला समर्पित केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lata Mangeshkar said that Dhoni should not retire after World Cup 2019