राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाने दूध, दुग्धजन्य पदार्थ, मसाले आणि कोलस्ट्रम तयार करणाऱ्या आस्थापनांवर मोठी कारवाई केली. राज्यातील चार आस्थापनांवर झालेल्या कारवाईत तब्बल पाच हजार सहाशे एकोणसाठ किलो साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत आठ लाख बावीस हजार पाचशे चाळीस रुपये आहे. पुणे विभागातून तीन हजार चारशे बासष्ट किलो, कोकण विभागातून दोन हजार एकशे बावीस किलो आणि छत्रपती संभाजीनगर विभागातून पंचाहत्तर किलो साठा जप्त करण्यात आला. याशिवाय चौदा जुलै ते सतरा ऑगस्टदरम्यान राज्यातील पासष्ट हॉटेल आणि उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली असून पन्नास आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली, तर आठ आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले. पुण्यात सर्वाधिक चाळीस हॉटेल आणि उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली असून छत्तीस आस्थापनांना नोटीस आणि एका आस्थापनाचा परवाना रद्द करण्यात आला.