esakal | 'हा तर ट्रेलर, कधीही संपवून टाकू', इस्त्रायल दुतावासाबाहेरील स्फोटाच्या ठिकाणी सापडलं पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

delhi blast 1.jpg

एका कॅबने दोन व्यक्तींना दुतावासाबाहेर सोडल्याचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजवरुन दिसते.

'हा तर ट्रेलर, कधीही संपवून टाकू', इस्त्रायल दुतावासाबाहेरील स्फोटाच्या ठिकाणी सापडलं पत्र

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत इस्त्रायलच्या दुतावासाबाहेर झालेला बॉम्बस्फोट छोट्या स्वरुपाचा असला तरी त्यामागे एखाद्या मोठ्या कटाची शक्यता वर्तवली जात आहे. जैश उल हिंद नावाच्या एका अनोळखी दहशतवादी संघटनेने या आयईडी स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. परंतु, सुरक्षा संस्थांकडून अजून याचा तपास सुरु आहे. स्फोटाच्या ठिकाणी मिळालेल्या पत्रानुसार काही संकेत मिळत आहेत. या पत्रात या सौम्य स्वरुपाच्या स्फोटाला ट्रेलर असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 2012 मध्ये इस्त्रायली दुतावासाच्या वाहनाला लक्ष्य केले होते. यावेळी चौकशीत इराणी संस्थेचा हात असल्याचे समोर आले होते. 

'टाइम्स ऑफ इंडिया'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले की, स्फोट झालेल्या ठिकाणी तपासयंत्रणांना एक लिफाफा आणि पत्र मिळाले आहे. दिल्ली पोलिसांतील सूत्रांनी सांगितले की, पत्रात हा स्फोट ट्रेलर असल्याचे म्हटले आहे. यात इराणचे माजी सैन्य अधिकारी कासिम सुलेमानी आणि इराणचे अणू शास्त्रज्ञ मोहसेन फखरिजादेह यांच्या हत्येचा उल्लेख करण्यात आला आहे. सुलेमानी जानेवारी 2020 मध्ये अमेरिकेच्या एअर स्ट्राइकमध्ये मारले गेले होते. तर अणू शास्त्रज्ञ फखरिजादेह यांना नोव्हेंबर 2020 मध्ये हत्या करण्यात आली होती. याचा आरोप इस्त्रायलवर करण्यात आला आहे. 

या पत्रात म्हटले आहे की, हा एक ट्रेलर आहे. आम्ही तुमचं आयुष्य संपवू शकतो. कधीही, कुठेही. इराणी शहीद. एका कॅबने दोन व्यक्तींना दुतावासाबाहेर सोडल्याचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजवरुन दिसते. परंतु, या व्यक्तींचा या स्फोटाशी काही संबंध आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिल्ली पोलिसांनी कॅब ड्रायव्हरशी संपर्क करुन दोघा व्यक्तींबाबत चौकशी केली आहे. स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर केला होता, असे सूत्रांकडून समजते. 

हेही वाचा- इस्त्रायल दुतावास स्फोट: घटनास्थळी मिळाला संशयित लिफाफा, बॉम्बसंबंधी साहित्य

दिल्लीतील ल्यूटियन्स परिसरात औरंगजेब रस्त्यावरील इस्त्रायली दूतावासाबाहेर शुक्रवारी एका सौम्य स्वरुपाचा आयईडी स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही हानी झाली नाही. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी घटनास्थळापासून काही अंतरावर बीटिंग रीट्रिट कार्यक्रम सुरु होता. यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित होते.  
 

loading image