Delhi News : नोएडामधील औषध कंपनीचा परवाना निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

License of medical company in Noida suspended Action against Marian Biotech after death of children in Uzbekistan

Delhi News : नोएडामधील औषध कंपनीचा परवाना निलंबित

नोएडा : उझबेकिस्तानमध्ये खोकल्याचे औषध प्यायल्यानंतर १८ मुलांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर नोएडामधील मॅरियन बायोटेक या औषध कंपनीचा परवाना उत्तर प्रदेश अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने निलंबित केला आहे, या वादग्रस्त औषधाचे निष्कर्ष अद्याप आलेले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

नोएडामधील कंपनीच्या कार्यालयात २९ डिसेंबरला केंद्रीय यंत्रणा आणि उत्तर प्रदेश औषध विभागाने सर्वेक्षण केले, त्यावेळी ‘डॉक-१ मॅक्स’ या औषधाचे आणखी सहा नमुने औषधाच्या चाचणीसाठी घेतले होते. खोकल्यावरील या औषधाच्या उत्पादनासंबंधी कागदपत्रे कंपनीचे प्रतिनिधी तपासणीच्यावेळी सादर करू शकले नाहीत.

त्यामुळे औषधाचे उत्पादन ताबडतोब थांबवण्याचा आदेश सरकारला दिला, अशी माहिती गौतम बुद्ध नगरमधील औषध निरीक्षक वैभव बब्बर यांनी दिली. कंपनीचा उत्पादन परवाना निलंबित करण्याचा आदेशही तत्काळ देण्यात आला होता.

आता मंगळवारी (ता.१०) कंपनीला निलंबनाचा लेखी आदेश देण्यात असल्याचे ते म्हणाले. चाचणीच्या निकालाच्या आधारे केंद्रीय यंत्रणांनी नमुने घेतले असून त्याच्या निष्कर्षांची प्रतीक्षा आहे.

एक लाख बाटल्यांची निर्यात

मॅरियन बायोटेक कंपनीने ‘डॉक-१ मॅक्स’ या खोकल्यावरील औषधाची विक्री भारतात केली नसून केवळ उझबेकिस्तानला त्याची निर्यात केली असल्याचे बब्बर यांनी पूर्वी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले होते. कंपनीने ४५ दिवसांत औषधाच्या एक लाख बाटल्या निर्यात केल्या आहेत.

हे औषध प्यायल्याने १८ मुलांचा मृत्यू झाला असल्याचा दावा उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्र्यांनी केला आहे. त्यानंतर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) या भारतातील फार्मास्युटिकल्स आणि वैद्यकीय उपकरणांसाठी केंद्रीय नियामक संस्थेने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.

दोन्ही देशांचे सरकार या घटनेची चौकशी करीत असल्याचे ‘मॅरियन बायोटेक’चे कायदेशीर प्रतिनिधी हसन हॅरिस यांनी यापूर्वी सांगितले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर कंपनीने औषधाचे उत्पादन थांबविले आहे.

मुलांना औषध न देण्याचा इशारा

दरम्यान, भारतातील ‘मॅरियन बायोटेक’ने तयार करीत असलेली खोकला प्रतिबंधक दोन औषधे मुलांना देऊ नयेत, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) केली आहे.

उझबेकिस्तानमधील घटनेच्या आधारे हे पाऊल संघटनेने उचलले आहे. गुणवत्तेची मानके ही उत्पादने पूर्ण करू शकलेली नाही. त्यामुळे अशी निकृष्ट औषधे मुलांना न देण्याचे आवाहन ‘डब्लूएचओ’ने बुधवारी (ता.११) केले असून ‘वैद्यकीय उत्पादन इशारा’ जाहीर केला आहे. कंपनीच्या ‘ॲब्रोनोल’ आणि ‘डॉक-१ मॅक्स’ या औषधांबद्दल हा इशारा दिला आहे. उत्पादनांच्या सुरक्षिततेबद्दल आणि गुणवत्तेची हमी कंपनीने ‘डब्लूएचओ’ला दिली नसल्याचेही म्हटले आहे.