Bihar Election: नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढण्यास पासवान यांचा नकार, भाजपशी मात्र युती

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 4 October 2020

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीत सुरु असलेल्या लोक जनशक्ती पार्टीच्या (लोजपा) केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीत सुरु असलेल्या लोक जनशक्ती पार्टीच्या (लोजपा) केंद्रीय संसदीय समितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात निवडणूक न लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बैठकीत लोजपा-भाजप सरकारचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. लोजपाचे सर्व आमदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात आणखी मजबूत करतील, असा प्रस्ताव बैठकीत संमत करण्यात आला. बैठकीत एक वर्षांपासून 'बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट'च्या माध्यमातून उठवण्यात आलेल्या मुद्द्यांवर लोजपा मागे हटण्यास तयार नाही. लोजपाच्या बैठकीत पक्षाचे सर्व सदस्य उपस्थित होते. 

पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली लोजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत भाजपबरोबर युती करण्याच्या बाजूने एक प्रस्ताव पारित करण्यात आला आणि पंतप्रधान मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे म्हटले. 

Hathras : जिल्हाधिकाऱ्यांचं निलंबन आणि SC च्या माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात...

लोजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अब्दुल खालिक यांनी बैठकीची माहिती देताना सांगितले की, वैचारिक मतभेदांमुळे जदयूबरोबर लोजपा आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नाही. राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजप आणि लोजपची मजबूत युती आहे. 
 

बिहारमध्ये अनेक जागांवर जदयूबरोबर वैचारिक लढत होऊ शकते, असे अब्दुल खालिक म्हणाले. लोजपा 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' व्हिजन डॉक्यूमेंटची अंमलबजावणी करु इच्छिते. परंतु, यावर सहमती बनू शकली नव्हती. लोजपाच्या मते, केंद्राच्या धर्तीवर बिहारमध्येही भाजपच्या नेतृत्त्वात सरकार बनावे. लोजपाचा प्रत्येक आमदार भाजपच्या नेतृत्त्वात बिहार फर्स्ट करण्याचे काम करेल. 

दरम्यान, बिहारमध्ये एनडीए मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढेल असे भाजपने यापूर्वीच जाहीर केले आहे. अशात लोजपाची एनडीएबरोबरची युती मोडली आहे. बिहारमध्ये 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LJP will not contest the upcoming Bihar Elections with JDU but alliance with bjp continue