लॉकडाउन 4.0 : पहिल्याच दिवशी दिल्ली-नोएडा सीमेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

वृत्तसंस्था
सोमवार, 18 मे 2020

देशातील लॉकडाऊनचा कालावधी 13 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. 18 मेपासून 31 मेपर्यंत चौथ्या टप्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून लॉकडाउनचा कालावधी वाढवल्यानंतर सोमवारी सकाळी दिल्ली-नोएडा सीमेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली-नोएडा डायरेक्ट(DND) मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडील परवाणे तपासण्यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. त्यामुळे शेकडो वाहने महामार्गावर अक्षरश: गोगलगायीच्या गतीने मार्गक्रमण करत होती. परिणामी दिल्ली-नोएडा सीमेवर चांगलाच खोळंबा झालेला पाहायला मिळाले.         
देशातील लॉकडाऊनचा कालावधी 13 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. 18 मेपासून 31 मेपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संसर्ग रोखण्यासाठी रसायनांची फवारणी केली, पण... 

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातील पहिल्याच दिवशी दिल्ली-नोएडा सीमेवर वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दिल्ली वाहतूक पोलिसांनी नागरिकांना कालिंदी कुंडी बॅरेज फ्लायओव्हर आणि दिल्ली-नोएडा डायरेक्ट मार्गावरुन ई-पासशिवाय सीमा न ओलांडण्याचा सल्ला दिला आहे.  नोएडा जिल्हाधिकाऱ्याने ज्यांना ये-जा करण्याचा परवाना दिला आहे अशांनाच उत्तर प्रदेश पोलीस राज्यात प्रवेश करु देत आहेत. लॉकडाउन शिथिल करताना केंद्र सरकारने कलर-झोन ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे. तसेच अंतिम निर्णय घेण्याचे अधिकारही राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउच्या चौथ्या टप्प्यात जारी केलेली गाईडलाईन दिल्ली सरकारने सुचवलेल्या गाईडलाईन प्रमाणेच असल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.  

बाप रे! चीनमध्ये उसळणार संसर्गाची दुसरी लाट

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात दुकाने, बाजार आणि कार्यालये सुरु ठेवण्याची मुभा सरकारकडून देण्यात आली आहे. शिवाय यासंबंधी अधिकचे निर्बंध लादण्याचे अधिकारही केंद्र सरकारने राज्यांकडे दिले आहेत. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये कोणतीही सवलत देण्यास सरकारने नकार दिला आहे.  देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी सकाळी कोरोना बाधितांचा आकडा 96 हजाराच्या पार गेला आहे. तसेच गेल्या 24 तासात 5242 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 179 जणांनी आपला जीव गमावला आहे. लॉकडाउनला 50 दिवस पूर्ण झाले असले तरी कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या अटोक्यात आलेली नाही. त्यामुळेच सरकारकडून आजपासून नव्या स्वरुपात लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना अधिकचे अधिकार देण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown 4 0 Traffic jam Delhi Noida border vehicle movement allowed with passes