esakal | दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढवला; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

बोलून बातमी शोधा

दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढवला; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन वाढवला; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक आठवडा लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज शनिवारी याबाबतची घोषणा केली आहे. या नव्या आदेशानुसार आता 10 मे सकाळी 5 वाजेपर्यंत दिल्लीमध्ये लॉकडाऊन लागू राहणार आहे. दिल्लीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा आता दुसऱ्यांदा करण्यात आली आहे. याआधी अरविंद केजरीवाल यांनी एक पत्रकार परिषद घेत 25 एप्रिल रोजी लॉकडाऊनची मुदत तीन मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं की, लॉकडाऊनच्या दरम्यान पॉझिटीव्हीटी रेट जवळपास 36-37 टक्क्यांपर्यंत पोहोचला. आम्ही दिल्लीमध्ये संक्रमणाचा एवढा दर याआधी पाहिला नव्हता. गेल्या एक दोन दिवसांमध्ये संक्रमणाचा दर कमी झाला आहे आणि आज तो 30 टक्क्यांच्या खाली आला आहे.

हेही वाचा: 'सत्य बोललो तर शीर कापलं जाईल'; अदर पुनावालांना बड्या हस्तींकडून धमक्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवल्याचं चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात चार लाख एक हजार 993 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात तीन हजार 523 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, गुजरातसह देशातील प्रमुख राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांत दोन लाख 99 हजार 988 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या एक कोटी 91 लाख 64 हजार 969 इतकी झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची दररोजची संख्या पाहता पुढील तीन दिवसांत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन कोटींच्या पुढे जाऊ शकते.