सत्ता आल्यास नितीश कुमारांना तुरुंगात टाकणार- चिराग पासवान

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 25 October 2020

लोक जनशक्ती पार्टीचे (Lok Janshakti Party) नेते चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासंबंधी मोठे वक्तव्य केले आहे.

पाटणा- लोक जनशक्ती पार्टीचे (Lok Janshakti Party) नेते चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासंबंधी मोठे वक्तव्य केले आहे. लोजपाची सत्ता आल्यास नितीश कुमार तुरुंगात असतील, असं ते म्हणाले आहेत. बक्सार येथील एका सभेत बोलताना चिराग यांनी हे वक्तव्य केले आहे. 

दारुबंदीची योजना पूर्णपणे फेल ठरली आहे. राज्यात बेकायदेशीर दारु विकली जात आहे आणि यातून नितीश कुमारांना काही फायदा होत आहे. लोक जनशक्ती पार्टीची सत्ता आल्यास नितीश कुमार आणि त्यांचे काही अधिकारी तुरुंगात असतील, असं पासवान म्हणाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधारी जेडीयू पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 

चिरास पासवान यांनी सोशल मीडियावर 'असंभव नितीश' आणि 'नितीशमुक्त सरकार' हॅशटॅगचा वापर करत अभियान सुरु केले आहे. त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, ज्या ठिकणी लोजपाचे उमेदवार उभे ठाकले नसतील, तेथे भाजपच्या उमेदवारांना मत द्या. 

चीनने जमीन बळकावल्याचं सत्य भागवत जाणतात, पण...; राहुल गांधींची टीका

चिराग पासवान यांनी वारंवार नितीश कुमारांवर टीका केली आहे. तसेच भाजप आणि लोजपाचे सरकार येणार असल्याचं ते म्हणत आहेत. त्यांनी नितीश कुमारांच्या जेडीयू विरोधात सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. अनेक ठिकाणी चिराग यांनी भाजपच्या बंडखोरांना लोजपातर्फे तिकीट देऊन जेडीयूविरोधात उभे केले आहे. चिराग पासवान यांची ही पहिलीच निवडणूक आहे आणि ते एकट्याच्या जीवावर निवडणूक लढत आहे. त्यांनी जेडीयूला विरोध केला आहे, पण भाजपला समर्थन दर्शवले आहे. 

चिराग पासवान यांनी एका सभेत सीतामढी येथे सीतेचे मंदिर बांधण्याचीही घोषणा केली आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, चिरास पासवान म्हणाले की, ''जसं सीता माता शिवाय भगवान राम अपूर्ण आहेत, तसेच रामाशिवाय सीता माताही पूर्ण नाहीत. त्यामुळे माझी इच्छा आहे की, ज्या प्रमाणे भव्य राम मंदिराचे निर्माण अयोध्येमध्ये होत आहे, त्यापेक्षा अधिक मोठे सीता मंदिर सीतामढी येथे व्हावे. यामागे माझा उद्धेश धार्मिक आणि पर्यटनाला चालना देण्याचा आहे. लोजपाची सरकार आल्यास आम्ही सीता मंदिराचा शिलान्याल करु.'' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lok Janshakti Party chirag paswan said about nitish kumar