Bhupendra Singh : उत्तर प्रदेश भाजपची सूत्रे भूपेंद्र सिंह यांच्याकडे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lok Sabha elections Uttar Pradesh BJP sources Bhupendra Singh politics

Bhupendra Singh : उत्तर प्रदेश भाजपची सूत्रे भूपेंद्र सिंह यांच्याकडे...

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी जाट नेते भूपेंद्रसिंह ऊर्फ भूपेंद्र चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच भाजपच्या नेतृत्वाने ही जबाबदारी अनुभवी पक्षनेते व सध्या पंचायती राज्यमंत्री भूपेंद्र सिंह यांच्यावर सोपवली आहे. दरम्यान, भाजपने त्रिपुरा प्रदेशाध्यक्षपदी राजीव भट्टाचार्य यांची तसेच हिमाचल प्रदेशच्या निवडणूक प्रभारीपदी खासदार सौदान सिंह यांची तर सहप्रभारी म्हणून देवेंद्रसिंह राणा यांचीही नियुक्ती केली.

भाजपने या व पुढच्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच २०२४ च्या लोकसभेचीही समांतर तयारी सुरू केली आहे. आज दुपारी उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी भूपेंद्रसिंह यांची नियुक्ती केल्याचे जाहीर करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, माजी उर्जामंत्री श्रीकांत शर्मा, कन्नौजचे खासदार सुब्रत पाठक, केंद्रीय मंत्री बी एल वर्मा आदींच्या नावाचींही चर्चा होती. मात्र शेतकरी आंदोलनानंतर पश्चिम उत्तर प्रदेशात अजूनही भाजपवर नाराज जाट मतपेढीला सांभाळण्यासाठीची जातीय व सामाजिक समीकरणे लक्षात घेऊन भूपेंद्रसिंह यांचे नाव अखेर दिल्लीतून निश्चित करण्यात आले. दरम्यान, माजी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना आदित्यनाथ यांनी आपल्या दुसऱ्या टीममध्ये सामील करून घेतले. त्यानंतर ‘एक व्यक्ती एक पद’ या धोरणानुसार प्रदेशाध्यक्षपद रिक्त होते. अध्यक्षपदाच्या काळात भाजपला २०१९ ची लोकसभा व यावर्षीची विधानसभा निवडणूक जिंकण्यास हातभार लावणारे स्वतंत्र देव सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन नियुक्ती न झाल्याने त्यांच्याकडेच कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार होता.

मौर्य यांचे नाव मागे पडले

भाजप नेतृत्वाच्या मनात सुरवातीला केशवप्रसाद मौर्य यांचे नाव होते. मात्र मौर्य व योगी यांची ‘जमलेली जोडी‘ लोकसभेआधी फोडण्याचे दिल्लीचे प्रयत्न तेव्हा थंडावले, जेव्हा याबाबत दोघांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली. योगी यांचे मत डावलणे भाजप नेतृत्वाला शक्य नाही. तशातच मौर्य यांना सरकारमधून हटवून कोणताही अपशकुन करू नये, हा विचार नेतृत्वाला पटला. त्यानंतर भूपेंद्र सिंह यांच्या नावाबाबत विचार सुरू झाला.

त्रिपुरात राजीव भट्टाचार्य

आगरताळा: त्रिपुराच्या प्रदेशाध्यक्षपदी भाजपने माजी मुख्यमंत्री बिप्लव देव यांचे निकटवर्तीय राजीव भट्टाचार्य यांची नियुक्ती केली आहे. भट्टाचार्य उपाध्यक्ष होते, तर प्रदेशाध्यक्षपद मुख्यमंत्री माणिक साहा यांच्याकडे होते. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जबाबदाऱ्या विभागण्यात आल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही नियुक्ती केली असून ती तातडीने अमलात येईल.

Web Title: Lok Sabha Elections Uttar Pradesh Bjp Sources Bhupendra Singh Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..