Lok Sabha Results Explained: राम मंदिर, ‘२०४७ ला विकसित भारतचं आश्वासन, तरीही मतदारांनी भाजपला धडा शिकवला का?

जनतेला गृहीत धरू नका; इंदिरा गांधींना सुद्धा सत्तेतून पायउतार व्हायला लावलेला हा देश आहे..
loksabha election explained
loksabha election explained esakal

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. गेल्या १० वर्षांपासून देशात एकहाती सत्तास्थापन करणाऱ्या भाजपला जनतेनेच दणका दिला. भाजपला चारशे पार सोडा २५० चा टप्पा ओलांडणेही कठीण झाले आहे. एनडीएकडे २९० पेक्षा जास्त जागांवर आघाडी असल्याने पुन्हा एकदा मोदी सरकार हे स्पष्ट झाले असले तरी या निकालाचा नेमका अर्थ काय, हे जाणून घेऊया...

जनतेला गृहीत धरू नका

इंदिरा गांधींना सुद्धा सत्तेतून पायउतार व्हायला लावलेला हा देश आहे.. त्यामुळे आम्हाला गृहीत धरू नका असा मेसेज या निवडणुकीच्या निमित्ताने मोदी आणि शहा या जोडगोळीला देशातील जनतेने दिला आहे. सामान्यांच्या प्रश्नांवर काम न केल्यानेच भाजपच्या विरोधात वातावरण तयार झाले असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ.नीरज हातेकर यांनी व्यक्त केले.

समत्वभावाचा अभाव

भारत हा बहुविध मतमतांचा देश आहे. इथे प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं असतं , प्रत्येकाला आपलं असं काही हवं असतं आणि बरोबर याच्या उलट भाजप वागताना दिसत होतं. मोदी आणि शहा ही जोडगोळी ही सर्वांचे ऐकून घेऊन सर्वांना सोबत घेऊन गेली नाही, याकडे डॉ. हातेकर यांनी लक्ष वेधले.

राजकीय विश्लेषक आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक मृदुल निळे म्हणाले, या निवडणुकीत अत्यंत वेगळा निकाल पाहायला मिळाला असे मला वाटते. एकीकडे काँग्रेसची भारत जोडो यात्रा, भारत न्याय यात्रा होत होती तर दुसरीकडे एकाच पार्टीचा डॉमिनन्स वाढत होता संविधानाची मूल्य पाळली जात नाही असे लोकांना वाटत होते. या दोन्ही गोष्टींचा परिणाम होत होता असं मला वाटतं. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसने जे मुद्दे घेतले ते सर्वसामान्यांच्या जवळचे होते. त्यांच्या रोजच्या जगण्यातले होते आणि लोकांना ते रिऍलिस्टिक वाटत होते.

धर्माचा मुद्दा रेटण्यात अपयश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. श्रीरंजन आवटे म्हणाले, राममंदिर उभं करुन धर्माचा मुद्दा रेटण्यात मोदींना अपयश आले कारण तोवर महागाईने लोकांचे कंबरडे मोडले. बेरोजगारीने लोक हैराण झाले. युवा वर्ग हताश झाला. शेतकरी हवालदिल झाला. स्त्रियांवरच्या अत्याचाराने अवघा देश हळहळला. बिल्किस बानो प्रकरण असो की ब्रिजभूषण सिंग किंवा आताचे प्रज्वल रेवण्णा लैंगिक शोषणाचे प्रकरण, भाजपचा चेहरा भेसूर दिसू लागला.

भ्रष्ट नेत्यांसोबतचा घरोबा भोवला

मोदींनी नेत्यांना विकत घेतले; पण नेत्यांना विकत घेऊन जनतेला खिशात घालता येत नाही, हे त्यांना कळले नाही. त्यात स्थानिक निवडणुका दोन-अडीच वर्षे लांबवल्या. इतका बट्ट्याबोळ केला की भाजपचा कट्टर समर्थकही भाजपला मतदान का करायचे, हे सांगू शकेना. संघावर मुजोरी केल्याने केडर दुरावले. मुख्य म्हणजे मोदींची प्रामाणिक ही प्रतिमा धूसर झाली, याकडे आवटे यांनी लक्ष वेधले.

२०४७ ला विकसित भारत, पण वर्तमानाचे काय?

महागाई, सुरक्षितता अशा कोणत्याही सामान्यांच्या प्रश्नांवर भाजपने या निवडणुकीत प्रचार केला नाही. भाजपने २०४७ ला विकसित देश करणार असे चित्र लोकांसमोर उभे केले पण ते कसे करणार त्यासाठी काय स्ट्रॅटेजी राबविणार याबद्दल काहीच सांगितले नाही. जिथे दोन वेळच्या जेवणाची, महागाईची चिंता सर्वसामान्यांना सतावत होती तिथे २०४७ चे चित्र सामन्यांना पचनी पडणारे नव्हते. त्यांना आजच्या प्रश्नांवर उत्तरे हवी होती, असे आवटेंचे म्हणणे आहे.

निवडणुकांमध्ये महत्वाचा ठरलेला फॅक्टर म्हणजे सामान्यांचे प्रश्न. देशात सध्या बेरोजगारीचा मुद्दा सर्वाधिक गंभीर मुद्दा आहे. मुख्य म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांच्या मुद्द्यावर जनतेमध्ये खूप असंतोष आहे. त्यातच निर्मला सीतारामन यांनी बेरोजगारांची आकडेवारीच नाही असे म्हणणे, चुकीची आकडेवारी सादर करणे या सगळ्या गोष्टींचा राग लोकांमध्ये होता, असे निरीक्षण हातेकर यांनी नोंदविले.

----------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com