Loksabha Election 2024 : ‘साखरेचा वाडगा’ काँग्रेससाठी कडू! देवरियात ओबीसी मतांवर भाजपची भिस्त

मुबलक ऊस उत्पादनामुळे ‘चिनी का कटोरा’ (साखरेचा वाडगा) म्हणून ओळखल्या जाणारा देवरिया जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक काँग्रेसला १९८४ नंतर जिंकता आली नव्हती.
Uttar Pradesh
Uttar Pradeshsakal

गौरीबाजार, देवरिया सदर (उत्तरप्रदेश) - मुबलक ऊस उत्पादनामुळे ‘चिनी का कटोरा’ (साखरेचा वाडगा) म्हणून ओळखल्या जाणारा देवरिया जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक काँग्रेसला १९८४ नंतर जिंकता आली नव्हती. तब्बल ४० वर्षांनंतर बेरोजगारी, ऊस उत्पादकांची थकबाकी यासारख्या स्थानिक मुद्द्यांच्या जोरावर व ‘इंडिया’ आघाडीची जातीय समीकरणांच्या आधारे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या.

येथे ब्राह्मण विरुद्ध राजपूत या उच्चवर्णीय उमेदवारांच्या लढतीमुळे सवर्ण मतांच्या विभाजनाचे आव्हान भाजपपुढे आहे. मात्र बसपच्या यादव उमेदवारांमुळे ओबीसी मतांमधील फाटाफुटीवर भाजपची भिस्त वाढली आहे.

ब्राह्मणबहुल देवरिया लोकसभा मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यानंतर ९० च्या दशकांपर्यंत काँग्रेस आणि समाजवादी विचारसरणीच्या पक्षांचे वर्चस्व राहिले होते. परंतु, ९० च्या दशकानंतर जेव्हा मंडल आणि राममंदिर आंदोलनामुळे पुढे आलेले कमंडल यामुळे बदललेल्या जातीय समीकरणानंतर भाजपला इथे संधी मिळाली.

यात काँग्रेसला देवरियामध्ये १९८४ मध्ये शेवटचा विजय मिळवता आला होता. त्यानंतर इथून काँग्रेसचा सफाया झाला. यंदाच्या लोकसभेमध्ये ‘इंडिया’ आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आल्यानंतर या पक्षाने राष्ट्रीय प्रवक्ते व रुद्रपूरचे आमदार अखिलेश प्रताप सिंह यांना मैदानात उतरवले.

तर भाजपने माजी खासदार श्रीप्रकाश मणी त्रिपाठी यांचे पुत्र शशांक मणी त्रिपाठी यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उच्चवर्णीय उमेदवारांमध्ये मुख्य लढत असली तरी बहुजन समाज पक्षाने संदेश यादव यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने यादव मतपेढीला साद घालण्याचा प्रयत्न केल्याने देवरियाच्या लढतीमधील रंजकता वाढली आहे.

देवरिया हा ब्राह्मणबहुल मतदारसंघ मानला जात असला तरी येथे इतर मागासर्गीय मतदार ५२ टक्के आहेत. तर मुस्लिम मते १४ टक्के, अनुसूचित जातीची मते १५ टक्के आहेत. ही समीकरणे जोडून काँग्रेस उमेदवार अखिलेश प्रतापसिंह यांनी रुद्रपूरमधील रस्त्यांच्या कामांचा प्रचार, सोबत सपचे यादव-मुस्लिम समीकरणामध्ये राजपूत समुदायाला जोडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी, बेरोजगारी, पेपरफुटी प्रकरण, महागाईसारख्या मुद्द्यांवर वातावरण तापविण्याचा प्रयत्न होत आहे.

तर, कायदा सुव्यवस्था सुधारणे, मोफत धान्यवाटप, पंतप्रधान मोदींचा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा चेहरा आणि ब्राह्मणबाहुल्य याआधारे विजयाची अपेक्षा बाळगणाऱ्या भाजपची मोठी भिस्त बसपच्या उमेदवाराकडून होणाऱ्या यादव मतांच्या संभाव्य विभाजनावर देखील आहे. सपचे स्थानिक नेते सतीशचंद्र यादव पेपरफुटीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा असल्याचा दावा करतात. कायदा सुव्यवस्था चांगली असेल तर पेपरफुटी का होते, हा त्यांचा सवाल आहे.

साखरेचा वाडगा देवरिया

महाराष्ट्रातील पश्चिम भागाप्रमाणेच पूर्वांचलमधील गोरखपूरलगत देवरिया जिल्हा हा ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. यात १४ साखर कारखाने असल्याने या भागाला साखरेचा वाडगा (चीनी का कटोरा) म्हटले जात होते. परंतु, सरकारची उदासीनता आणि शेतकरी ऊस लागवडीपासून दुरावल्याने देवरिया जिल्ह्यात फक्त एकच साखर कारखाना सुरू आहे.

या भागातील मर्यादित साधनांमुळे रोजगारासाठी स्थलांतर ही येथील प्रमुख समस्या आहे. या जोडीला भ्रष्टाचार, महागाई, पेपरफुटी प्रकरण, रखडलेले कृषी विद्यापीठ यासारखे मुद्देही स्थानिक पातळीवर तापले असल्याने परिणाम प्रचारात दिसतो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com