लोकसभेत प्रश्‍नोत्तराचा तास बंद पाडला; दरवाढीविरोधात निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Loksabha

लोकसभेत प्रश्‍नोत्तराचा तास बंद पाडला; दरवाढीविरोधात निदर्शने

नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाल्याने संसदेत विरोधकांनी महागाईचा मुद्दा आज पुन्हा गाजवला आणि लोकसभेत जोरदार घोषणाबाजी करून प्रश्नोत्तराचा तास बंद पाडला. काँग्रेसने संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर दरवाढी विरोधात निदर्शने केली. मात्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी या निदर्शनांपासून दूरच राहिल्याचे दिसले.

काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांमधील खासदारांनी एलपीजी गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर विरोधात संसद भवनाच्या आवारातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी केली. युक्रेन–रशिया युद्ध केवळ बहाणा आहे. सरकारचे धोरणच महागाई वाढविणारे असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.मात्र, या निदर्शनांमध्ये सोनिया गांधी किंवा राहुल गांधी सहभागी झाले नव्हते. लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये काँग्रेसच्या, तृणमूल कांग्रेसच्या खासदारांनी इंधन दरवाढीच्या विरोधात जोरदार गोंधळ घातला. या गोंधळात पिठासीन अधिकाऱ्यांनी कामकाज चालविण्याचा प्रयत्न केला.

मात्र तो अयशस्वी ठरल्याने कामकाज दुपारी बारापर्यंत तहकूब करण्यात आले. तर, लोकसभेमध्ये काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी शून्य काळात हा मुद्दा उपस्थित करताना सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरणारी इंधन दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी केली. सरकार मागील आठ वर्षांपासून सुनियोजित पद्धतीने दरवाढ करत असून आतापर्यंत २६ लाख कोटी रुपये कमावले. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची दरवाढ ही केवळ बहाणेबाजी आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी शुल्क सरकारने वाढविले आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, असा हल्ला अधीररंजन चौधरी यांनी चढवला.

निवडणुकाच महागाई रोखतील

राष्ट्रवादी कांग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महागाईवरून सरकारला शालजोडीतले फटके लगावले. गगनाला भिडलेली महागाई कधी कमी होणार हे देवालाही सांगता येणार नाही. मात्र महागाईला लगाम केवळ निवडणुकाच लावू शकतात, असा टोमणा सुळे यांनी मारला.

महागाईच्या चर्चेपासून सरकारचा पळ: देव

तृणमूल कांग्रेसनेही महगाईवरून सरकारवर टीकास्त्र सोडले. तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार सुष्मिता देव यांनी, सरकार महागाईवरील चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप केला. सरकारकडे मागणी होती, की इंधनाच्या वाढत्या दरांबाबत चर्चा करावी. मात्र काल चर्चेकडे पाठ फिरवली होती. आजही सरकारने चर्चा टाळली सभागृहातील चर्चेतून स्पष्ट झाले असते, की ही दरवाढ म्हहणजे निव्वळ लूट आहे. यातून जमा होणाऱ्या पैशांचे सरकार काय करत आहे याचाही हिशेब नाही, असाही प्रहार सुष्मिता देव यांनी केला.

माध्यान्ह भोजन सुरू करा

शाळांमधील माध्यान्ह भोजन योजनेवर कोरोनामुळे झालेल्या परिणामांचा मुद्दा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी आज लोकसभेत उपस्थित केला. शाळांमध्ये मुले येत असताना त्यांना सकस आहाराची गरज आहे. त्यामुळे माध्यान्ह भोजन योजना सुरू करावी, अशी मागणीही सोनिया गांधींनी केली.

लोकसभेत शून्य काळात सोनिया गांधींनी हा मुद्दा उपस्थित केला. सोनिया गांधी म्हणाल्या, की देशाचे भविष्य म्हणविल्या जाणाऱ्या बालकांवर परिणाम करणारा हा विषय आहे. कोरोना सुरू झाल्यापासून त्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. आता शाळा उघडल्या आहेत. मात्र, शाळा बंद असताना माध्यान्ह भोजनाची व्यवस्थाही बंद झाली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे सरकारने लोकांना कोरडा शिधा दिला. परंतु, पौष्टिक अन्नाला कोरडा शिधा हा पर्याय होऊ शकत नाही. मुले आता परत आल्याने त्यांना पोषणाची गरज आहे. एवढेच नव्हे, तर कोरोना काळात शिक्षण सोडणाऱ्या मुलांना परत आणण्यासाठी देखील माध्यान्ह भोजनाची मदत होईल, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या २०१९-२० च्या आकडेवारीनुसार २०१५-१६ च्या तुलनेत असुरक्षित असलेल्या गटामध्ये पाच वर्षाखालील मुलांची टक्केवारी वाढली आहे. ही बाब चिंताजनक असल्याकडे सोनिया यांनी लक्ष वेधले.

Web Title: Loksabha Question Answer Session Fuel Rate Grow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :loksabhaFuel
go to top