लखनौकरांसाठी ते फक्त "अटलजी'! 

शरद प्रधान
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

लखनौ : पंतप्रधानपदी असोत किंवा खासदार, सर्वसामान्य लखनौवासीयांसाठी ते कायम "अटलजी'च राहिले! लोकसभेच्या पाच निवडणुका लखनौमधून जिंकलेल्या अटलबिहारी वाजपेयींचे या नबाबी शहराबरोबरचे नातेच वेगळे होते. 

लखनौ : पंतप्रधानपदी असोत किंवा खासदार, सर्वसामान्य लखनौवासीयांसाठी ते कायम "अटलजी'च राहिले! लोकसभेच्या पाच निवडणुका लखनौमधून जिंकलेल्या अटलबिहारी वाजपेयींचे या नबाबी शहराबरोबरचे नातेच वेगळे होते. 
वाजपेयींच्या सर्वसमावेशक स्वभावाचा लखनौवर प्रभाव होता. 1991 ते 2009 या काळात त्यांनी येथून प्रतिनिधित्व केले होते. समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांतील समर्थक हे वाजपेयींचे त्यांच्या अन्य सहकाऱ्यांपेक्षा वेगळेपण होते. आश्‍चर्याची बाब म्हणजे, लखनौच्या मुस्लिम समाजातील मोठा वर्ग त्यांचा चाहता आणि समर्थकही होता. 1999 च्या निवडणुकीत मुस्लिम युवकांचा एक गट वाजपेयींच्या प्रचारात सहभागी झाल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीने पाहिले आहे; पण केवळ पाहण्यावर विश्‍वास न ठेवता मी दुसरीकडे चौकशी करून त्याची खात्री करून घेतली होती. वाजपेयींचे विश्‍वासू सहकारी लालजी टंडन यांनी माझी काही ज्येष्ठ मुस्लिम नागरिकांबरोबर भेट घालून दिली. या समाजाला वाजपेयींबाबत का प्रेम आहे, हे त्यांच्याबरोबर बोलल्यावर मला समजले. 

आज येथील मुस्लिम समाजाची आर्थिक स्थिती नक्कीच चांगली आहे आणि त्यामागे आहेत वाजपेयी. 1977-80 या काळात वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच पश्‍चिम आशियातील रोजगाराच्या संधींचे दरवाजे मुस्लिमांसाठी उघडले गेले, अशी माहिती चौक भागातील एका बुजर्गाने दिली. मुस्लिम वसाहतींमधील स्वच्छता आणि अन्य प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी वाजपेयींनी टंडन यांच्यावर सोपविली आणि त्यामुळे आज या वसाहती स्वच्छ दिसत असल्याचे एका मुस्लिम तरुणाने सांगितले. स्वतः वाजपेयी संघाच्या मुशीत तयार झाले होते; पण त्यांच्या सर्वसमावेशक वृत्तीमुळे आणि केव्हाही कोणालाही भेटण्यास तयार असण्याच्या त्यांच्या स्वभावाचा मतदारांवर अनुकूल परिणाम झाला. नबाबी लखनौ शहरात वाजपेयी साधेपणानेच राहत होते.

तीन शयनकक्षांच्या एका सदनिकेत त्यांचा मुक्काम असे आणि त्यांच्या घराचे दरवाजे सदैव स्वागतासाठी खुले असत. लखनौ भेटीत ते अनेकदा सर्वसामान्यांना भेटत, गप्पा मारत आणि स्वतःच्या काव्यरचनाही ऐकवत. पत्रकारांनाही वाजपेयींकडे मुक्त प्रवेश होता. लखनौमधील आज प्रगती वाजपेयींच्या प्रयत्नांतून झाली आहे. एकाच वाक्‍यात सांगायचे, तर वाजपेयी सर्वांचे होते, सर्वांसाठी होते! 

Web Title: For the Lucknow they are only Atalji