ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं?

टीम ई-सकाळ
Sunday, 29 December 2019

लखनौमध्ये माजी आयपीएस अधिकारी एसआर दारापुरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या नातेवाईकांची भेट घेण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी गेल्या दोन-तीन दिवसांपासून करत होत्या.

लखनौ : एकेकाळी किरण बेदी यांनी तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची राँग पार्किंगमधील गाडी उचलून नेल्याचा किस्सा सांगितला जातो. तसाच काहीसा किस्सा इंदिरा गांधी यांची नात आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबाबतीत घडला. फक्त हा प्रकार दिल्लीत नाही तर, लखनौमध्ये घडला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

का केला पोलिसांनी दंड?
सध्या उत्तर प्रदेशमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळालंय. अलिगडमध्ये जवळपास दहा हजारहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना, माजी अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लखनौमध्ये माजी आयपीएस अधिकारी एसआर दारापुरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या नातेवाईकांची भेट घेण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी गेल्या दोन-तीन दिवसांपासून करत होत्या. त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटकाव केला होता. पण, काल प्रियंका गांधी यांनी दारापुरी यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळी प्रियंका यांनी कारचा वापर न करता, एका काँग्रेस कार्यकर्त्यांच्या टू-व्हिलवरवरून जाण्याचा निर्णय घेतला. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळं प्रियंका गांधी यांच्याकडं हेल्मेट नव्हते. त्यामुळं त्यांनी पोलिसांनी त्यांना एका चौकात अडविले. हेल्मेट न वापरल्याबद्दल त्यांना 6 हजार 100 रुपयांता दंड ठोठावण्यात आला. त्यांनी तो दंड भरला देखील.

आणखी वाचा - मायवतींच्या एका निर्णयाने काँग्रेसची पंचाईत; सरकार धोक्यात

दारापुरी यांच्या पत्नीची घेतली भेट
उत्तर प्रदेश पोलिसांनी एसआर दारापुरी यांच्यावर हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला आहे. दारापुरी यांच्या पत्नी आाजरी आहेत. त्यामुळं घरी झोपून असलेल्या त्यांच्या पत्नीची भेट घेऊन प्रियंका गांधी यांनी त्यांची विचारपूस केली. दरम्यान, पोलिसांनी अडवणूक करून माझा गळा दाबला, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला होता. पण, त्यावर उत्तर प्रदेशचे मंत्री सिद्धार्थनाख सिंह यांनी प्रियंका गांधी खोटं बोलत आहेत, असा आरोप केलाय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lucknow traffic police fined congress leader priyanka gandhi for not wearing helmet