लसीकरण वाढवण्यासाठी केंद्राची नवी आयडीया; लकी ड्रॉ आणि इतर उपक्रमांचा घेणार आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

लसीकरण वाढवण्यासाठी केंद्राची नवी आयडीया; लकी ड्रॉ आणि इतर उपक्रमांचा घेणार आधार

नवी दिल्ली : केंद्र सरकार आता लसीकरणाची गती वाढवण्यासाठी वेगवेगळी धोरणे आखत आहे. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याच्या सुचना देण्यात येणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. कोरोनाविरुद्ध लसीकरणाला गती देण्यासाठी साप्ताहिक किंवा मासिक लकी ड्रॉ कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने आखलेल्या धोरणांपैकी हा एक कार्यक्रम आहे, असं सूत्रांनी रविवारी सांगितलं आहे.

हेही वाचा: 'केंद्र सरकारची योग्य दिशेने वाटचाल, पण...', टिकैत यांची प्रतिक्रिया

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आखलेल्या या योजनांमध्ये कामाच्या ठिकाणी लसीकरण मोहिम आयोजित करणे, लकी ड्रॉ आयोजित करणे तसेच पूर्णपणे लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांना बॅज प्रदान करणे यासारख्या आणखीही इतर उपक्रमांची योजना आखली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लवकरच हे उपक्रम हाती घेण्यासाठी सुचवलं जाणार आहे. लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी गावांमधील प्रभावशाली व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे.

लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा लोकांना 'राजदूत' म्हणून नियुक्त केले जाऊ शकतं आणि सरकारच्या 'हर घर दस्तक' उपक्रम राबवण्यामध्ये त्यांची मदत घेतली जाऊ शकते. वेळेवर लसीचे डोस घेणे आणि लसीकरणाचे वेळापत्रक पूर्ण करणे या दोन्ही गोष्टींच्या महत्त्वाबद्दल ते लोकांना सल्ला देऊ शकतात, असा सरकारचा मानस आहे.

हेही वाचा: तोपर्यंत विश्वास नांगरे पाटलांना नोकरीतून मुक्त करा: किरीट सोमय्या

ज्यांनी अजून एक डोस घेतलेला नाही अशांसाठी सरकारने घरोघरी जाऊन कोविड-19 लसीकरणासाठी महिनाभर चालणारी 'हर घर दस्तक' मोहीम सुरू केली आहे. कामाच्या ठिकाणीही लसीकरण आयोजित केले जाऊ शकते. ज्यांचं लसीकरण बाकी आहे अशा लोकांना यासाठी लक्ष्य केले जाऊ शकते. खाजगी आणि सरकारी कार्यालये आणि इतर कामाच्या ठिकाणी कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी 'माझे पूर्णपणे लसीकरण झाले आहे, तुम्ही लसीकरण केले आहे का?' असा लसीकरण संदेश असलेले बॅज दिले जाऊ शकतात. असं एका सूत्राने सांगितले.

तसेच, पूर्ण लसीकरण झालेल्यांसाठी साप्ताहिक किंवा मासिक लकी ड्रॉ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो. त्यांना यामध्ये घरातील वस्तू जसे की स्वयंपाकघरातील उपकरणे, रेशन किट, प्रवास पासेस, लकी ड्रॉच्या विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाऊ शकतात.

अधिकार्‍यांच्या मते, भारतातील पात्र लोकसंख्येपैकी सुमारे 82 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर सुमारे 43 टक्के लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. 12 कोटींहून अधिक लाभार्थी दोन डोसमधील विहित मध्यांतर कालबाह्य झाल्यानंतर त्यांच्या COVID-19 लसीच्या दुसऱ्या डोससाठी थकीत आहेत.

loading image
go to top