

Mission Aadi Seva
sakal
मध्य प्रदेश : एकेकाळी नक्षलवादाच्या प्रभावाखाली असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात आता विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील १०० गावांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मिशन आदी सेवा’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मिशनअंतर्गत ३३० कोटी रुपये खर्चून ८०० हून अधिक विकासकामे राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी आदित्य सिंह यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रशासनाच्या पथकाने आतापर्यंत सुमारे ७० गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. स्थानिक गरजा आणि उपलब्ध साधनसंपत्ती लक्षात घेऊन शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यटन आणि मूलभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे.