गाय, गोमूत्र आणि शेण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करु शकतात; 'या' मुख्यमंत्र्यांचं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cow

गाय, गोमूत्र आणि शेण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करु शकतात; 'या' मुख्यमंत्र्यांचं विधान

Shivraj Singh Chouhan on Cow dung: मध्य प्रदेशामध्ये हिंदुत्वासंबंधी अनेक गोष्टींना सरकारी पातळीवरुन समर्थन मिळत असल्याचं नेहमी दिसून येतं. याचाच प्रत्यय आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या एका वक्तव्यातून येतो आहे. शनिवारी त्यांनी असं विधान केलंय की, गाय आपल्या शेण आणि मूत्रासह देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकते. सिंह हे भोपाळमध्ये भारतीय पशू चिकित्सा संघाच्या महिला समेंलनामध्ये संबोधित करत होते. तेंव्हा ते म्हणाले की, गायीशिवाय बैलाची अनेक कामे होऊ शकत नाहीत. म्हणूनच, ती खूपच महत्त्वाची आहेत. जर योग्य व्यवस्था साकारली गेली तर गाय, तिचे शेण आणि तिचे मूत्र राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करण्यामध्ये मदत करु शकते.

यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसेच या भागातील महिलांच्या योगदानामुळे मला असा विश्वास आहे की आपण यशस्वी होऊ. गोबर आणि गोमूत्रापासून आपण अनेक महत्त्वाचे पदार्थ तयार करु शकतो, ज्यामध्ये किटकनाशकांपासून ते औषधांचा समावेश आहे.

गौप्रेमी मध्यप्रदेश

देशातील पहिले गौ अभयारण्य मध्य प्रदेशात असल्याचा दावा केला जातो ज्याचं उद्घाटन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. गेल्या वर्षी राज्यामध्ये भाजप सरकारने सहा विभागांच्या मंत्र्यांसोबत एका गौ कॅबिनेटच्या स्थापनेचीही घोषणा केली होती. यामुळे राज्यात गायीचं संरक्षण आणि गायीचं उत्पादन वाढवण्यासाठी कार्य केलं जाईल. मध्य प्रदेशच्या 2018 च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये देखील गायीवर अधिक जोर देण्यात आला होता. यामध्ये प्रत्येक गावात गौशाळा बांधण्याचे तसेच गोमूत्राचे व्यावसायिक उत्पादन सुरु करण्याचे आश्वासन होते.

loading image
go to top