"एमपी'च्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरवात

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

कॉंग्रेसच्या मुकेश नायक, सुंदरलाल तिवारी, डॉ. गोविंद सिंह, बाला बच्चन आणि जितू पटवाणी या नेत्यांनी इंधनावरील मूल्यवर्धित कराच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. राज्य सरकारने डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये 27 टक्‍क्‍यांवरून 22 टक्के, तर पेट्रोलवरील करात 31 वरून 28 टक्‍क्‍यांपर्यंत कपात केल्याची माहिती पटेल यांनी आपल्या भाषणात दिली

भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनास आज राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या भाषणाने सुरवात झाली. विरोधी पक्ष कॉंग्रेसने शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी करत पेट्रोलवरील मूल्यवर्धित कराबद्दलही जोरदार टीका केली.

कॉंग्रेसच्या मुकेश नायक, सुंदरलाल तिवारी, डॉ. गोविंद सिंह, बाला बच्चन आणि जितू पटवाणी या नेत्यांनी इंधनावरील मूल्यवर्धित कराच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. राज्य सरकारने डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये 27 टक्‍क्‍यांवरून 22 टक्के, तर पेट्रोलवरील करात 31 वरून 28 टक्‍क्‍यांपर्यंत कपात केल्याची माहिती पटेल यांनी आपल्या भाषणात दिली. पटेल यांनी सरकारने विविध क्षेत्रांत मिळविलेल्या यशाचा लेखाजोखा आपल्या भाषणात मांडला. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्याने यंदाही केंद्र सरकारचा "कृषी कर्मण' पुरस्कार प्राप्त केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. राज्यपालांचे भाषण निष्प्रभ असून, सरकार यशाच्या केवळ गप्पा मारत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते अजय सिंह यांनी केली.

कपात करूनही इंधनावरील कर इतर राज्यांच्या तुलनेत जास्तच असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला असून, सरकारने पेट्रोल उत्पादनांवरील सेस वाढविल्याचे बच्चन यांनी निदर्शनास आणून दिले. ही उत्पादने वस्तू सेवा कराअंतर्गत आणावीत, अशी कॉंग्रेसची मागणी असल्याचेही त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhya pradesh congress