दहा वर्षांपासून भीक मागणारा निघाला DSP च्या बॅचचा पोलिस अधिकारी

manish mishra
manish mishra

भोपाळ - कडाक्याच्या थंडीत रस्त्याच्या कडेला एक भिकारी कुडकुडत बसलेला पाहून मध्य प्रदेशातील डीएसपीने त्याची चौकशी केली. त्यावेळी भिकारी डीएसपीच्या बॅचचा पोलिस अधिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आपल्या सहकाऱ्याला अशा अवस्थेत पाहून डीएसपींना धक्का बसला. मध्य प्रदेशात 10 नोव्हेंबरला 28 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीची मतमोजणी झाली. मतमोजणीनंतर ग्वाल्हेरमधील डीएसपी रत्नेश सिंह तोमर आणि विजय सिंह भदौरिया झाशी रोडने जात होते. त्यावेळी वाटेत रस्त्याकड़ेला त्यांना एक भिकारी थंडीत कुडकुडत बसलेला दिसला. 

भिकाऱ्याला रस्त्याकडेला पाहताच डीएसपींनी गाडी थांबवली आणि खाली उतरून त्याच्याजवळ गेले. रत्नेश यांनी त्याला आपले बूट दिले तर डीएसपी विजय सिंह भदौरिया यांनी जॅकेट दिलं. दोन्ही अधिकाऱ्यांनी भिकाऱ्यासोबत बोलायला सुरुवात केली. भिकाऱ्याने दिलेल्या माहितीनंतर दोघेही आश्चर्यचकीत झाले. तो भिकारी दुसरा तिसरा कोणी नाही तर त्यांचा बॅचमेट निघाला. गेल्या दहा वर्षांपासून ते भिकारी बनून फिरत आहेत. जे काही मिळतं तेवढं खाऊन दिवस काढत आहेत. रात्री झोपायला एखादा बसस्टॉप किंवा अडोसा मिळेल त्याठिकाणी विश्रांती घ्यायची असं आयुष्य जगत होते. 

एकेकाळी पोलिस अधिकारी असलेल्या पण आता भिकारी बनलेल्या त्या व्यक्तीचं नाव मनीष मिश्रा असं आहे. ज्या दोन अधिकाऱ्यांनी त्यांना पाहिलं आणि बोलले त्यांच्याच बॅचमधून मनिष मिश्रा पोलिस सेवेत दाखल झाले होते. 1999 मध्ये मनिष मिश्रा मध्य प्रदेश पोलिसात पोलिस उप निरीक्षक म्हणून भरती झाले होते. त्यांचे सहकारी रत्नेश सिंह तोमर आणि विजय सिंह यांना पदोन्नती मिळून ते डीएसपी झाले तर मनिष यांचं आयुष्य असं काही उलट्या दिशेनं गेलं की ते भिकारी झाले. 

मनिष मिश्रा यांना दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांनी ओळखलं तेव्हा त्यांनी आयुष्याची कहाणी सांगितली. मनिष मिश्रा मध्य प्रदेश पोलिसात एसएचओ म्हणून तैनात होते. 2005 पर्यंत त्यांच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चाललं होतं. त्यानंतर मनिष यांची मानसिक स्थिती बिघडली आणि सगळंच बिघडत गेलं. पोलिस अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांची उत्कृष्ट नेमबाज अशी खास ओळख होती. त्यांचं शेवटचं पोस्टिंग मध्य प्रदेशातील दतिया पोलिस ठाण्यात झाली होती. त्यानंतर मानसिक संतुलन बिघडल्यानं त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र कोणत्याही औषधांचा म्हणावा तसा गुण आला नाही. 

मानसिक संतुलन बिघडल्यानंतर कुटुंबानेसुद्धा त्यांची साथ सोडली. पत्नी घर सोडून माहेरी निघून गेली आणि नंतर घटस्फोट घेतला. मनिष यांची अवस्था इतकी वाईट झाली की ते घरातून बाहेर पडून बेवारस असल्यासारखे फिरायला लागले. हळू हळू भीकही मागण्यास सुरुवात केली आणि कधी दहा वर्षांचा काळ गेला हेसुद्धा समजलं नाही. 

मनिष यांचा राव ते रंक असा प्रवास ऐकल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी त्याला सोबत येण्याचा आग्रह केला. मात्र मनिष यांनी त्यांच्यासोबत येण्यास नकार दिला. शेवटी मनिष यांना एका समाजिक संस्थेत पाठवलं. आता तिथेच त्यांची देखभाल आणि उपचार सुरू आहेत. 

मनिष यांच्यावर भीक मागण्याची वेळ आणि मात्र त्यांचे कुटुंब अधिकाऱ्यांचे म्हणून ओळखले जाते. मनिष यांचे भाऊ पोलिसात आहेत. काका आणि वडील एसएसपी होते आणि निवृत्त झाले आहेत. त्यांची बहीण ही दूतावासात उच्च पदावर कार्यरत आहे तर घटस्फोट घेतलेली पत्नी न्याय विभागात अधिकारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com