मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांना झटका, काँग्रेस आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

भाजपकडे 107 जागा आहेत. बहुमतासाठी त्यांना आणखी 9 जागांची आवश्यकता आहे. 

भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये सध्या पोटनिवडणुका होत आहेत. याचदरम्यान काँग्रेसला धक्का बसला आहे. दमोहचे काँग्रेसचे आमदार राहुल लोधी यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्याकडे राजीनामा सोपवणारे राहुल लोधी यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. 

काँग्रेसचे आमदार प्रद्युम्नसिंह लोधी भाजपत गेल्यापासून त्यांचे छोटे बंधू राहुल लोधी हेही भाजपत जातील अशा चर्चा रंगली होती. मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्यातील 28 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडे 107 जागा आहेत. बहुमतासाठी त्यांना आणखी 9 जागांची आवश्यकता आहे. 

राज्यातील विधानसभेच्या 28 जागांवरील पोटनिवडणुकीच्या निकालावरुन शिवराजसिंह सरकारच्या भविष्याचा निर्णय होईल. काँग्रेसच्या 22 आमदारांनी (ज्यातील 19 जणांनी ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थन केले होते.) आणि नंतर तीन इतर आमदारांनी पक्ष बदल केल्याने 25 जागा रिक्त झाल्या होत्या. तर तीन जागा विद्यमान आमदारांचे निधन झाल्याने रिक्त होत्या. 

हेही वाचा- Bihar Election: प्रचाराला निघालेल्या उमेदवाराची हत्या, जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhya Pradesh Rahul Lodhi joins BJP in presence of Chief Minister Shivraj Singh Chouhan