Bihar Election: प्रचाराला निघालेल्या उमेदवाराची हत्या, जमावाच्या मारहाणीत हल्लेखोराचाही मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

बाइकवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे एकच हल्लकल्लोळ उडाला.

पाटणा Bihar Election 2020 - प्रचारासाठी निघालेल्या उमेदवार आणि त्याच्या समर्थकाची शनिवारी हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवहर येथील जनता दल राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार नारायण सिंह आणि त्यांच्या समर्थकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. एका हल्लेखोराचा समर्थकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. 

या घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा मिळालेला आहे. नारायण सिंह यांच्याबरोबर जखमी झालेल्या दोन व्यक्तींपैकी एक संतोषकुमार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा व्यक्ती अभयकुमार उर्फ आलोक यांच्यावर उपचार सुरु आहे. 

नारायण सिंह पुरनाहिया प्रखंड येथील हथसार गावात प्रचारात व्यग्र होते. त्याचवेळी बाइकवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे एकच हल्लकल्लोळ उडाला. तर नारायण सिंह यांना गोळी लागल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. 

हेही वाचा- VIDEO - मतांसाठी भाजप मंत्र्याने काँग्रेस कार्यकर्त्यासमोर टेकले गुडघे

त्याचवेळी त्यांच्या समर्थकांनी आणि जमावाने पाठलाग करत हल्लेखोरांना पकडून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये जावेद नावाच्या हल्लेखोराचा मृत्यू झाला तर दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा- मुफ्ती यांचे मानसिक संतुलन बिघडले; विहिंप यांचा आरोप

या घटनेत जखमी असलेले अभयकुमार यांनी प्रचार सुरु असताना सुमारे 8 ते 10 जणांच्या संख्येने हल्लेखोर आल्याचे सांगितले. अचानक गोळीबार झाला. आम्ही बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नारायण सिंह यांना गोळी लागली. त्यामुळे ते जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election 2020 Janta Dal Rashtrawadi Partys Candidate Narayan Singh Shot At In Hathsar Village