Atiq Ahmed ला घेऊन जाणाऱ्या व्हॅनच्या धडकेत गाय ठार; मिशीला पीळ मारत अतिक म्हणाला, मी घाबरत नाही.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atiq Ahmed News

Atiq Ahmed ला घेऊन जाणाऱ्या व्हॅनच्या धडकेत गाय ठार; मिशीला पीळ मारत अतिक म्हणाला, मी घाबरत नाही..

Atiq Ahmed News : उत्तर प्रदेशातील माफिया डॉन अतिक अहमदचा ताफा आज (सोमवार) सकाळी मध्य प्रदेशच्या सीमेत प्रवेश करत असताना शिवपुरीतील रामनगर टोल प्लाझातून गेला.

इथं सकाळी साडेसहा वाजता अतिक अहमदला कडक सुरक्षा व्यवस्थेत व्हॅनमधून खाली उतरवण्यात आलं. यादरम्यान अतिकनं मिशीला पिळ मारत काहीही बोलण्यास नकार दिला. पत्रकारांनी अतिकला तुम्ही घाबरलात का? असा प्रश्न केला असता, त्यानं मी घाबरत नसल्याचं उत्तर दिलं. यानंतर तो हात वरती करत व्हॅनच्या दिशेनं निघाला.

शिवपुरी जिल्ह्यातून जाणारा गुंड अतिक अहमदचा ताफा तिथल्या खराई चेकपोस्टवरून जात असताना अचानक एक गाय अतिकच्या व्हॅनसमोर आली आणि व्हॅनला धडक दिली. या अपघातात गायीचा जागीच मृत्यू झाला. मात्र, व्हॅन पलटी होण्यापासून बचावली. यानंतर संपूर्ण ताफा काही काळ थांबवण्यात आला आणि नंतर हा काफिला यूपीतील प्रयागराजकडं रवाना झाला.

अतिक अहमदला घेऊन जाणारा ताफा मध्य प्रदेशच्या सीमेपर्यंत सुमारे 130 किलोमीटरचा प्रवास करत होता. हा ताफा शिवपुरीच्या करैरा आणि दिनारा शहराला लागून असलेल्या फोरलेन मार्गे यूपीच्या झाशी जिल्ह्यात जाईल. त्यानंतर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमार्गे उत्तर प्रदेशच्या सीमेवर ताफा दाखल होईल. हा काफिला गुजरात ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज असे सुमारे 1300 किलोमीटरचं अंतर कापत आहे.

अतिक अहमद प्रकरणी सीएम योगींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

अतिक अहमदला प्रयागराज इथं आणण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिकला प्रयागराज इथं आणल्यानंतर त्याचं पुढं काय होणार याबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, डीजीपी डीएस चौहान, मुख्य सचिव दुर्गा शंकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सामील होते, त्यांनी पुढील रणनीतीवर चर्चा केली.

टॅग्स :Uttar PradeshCrime News