News Update: दिवसभरात काय घडल्या महत्त्वाच्या घडामोडी? जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

News Update: दिवसभरात काय घडल्या महत्त्वाच्या घडामोडी? जाणून घ्या सविस्तर

News Update: दिवसभरात काय घडल्या महत्त्वाच्या घडामोडी? जाणून घ्या सविस्तर

देशभरातील 200 रेल्वे स्थानकांचे होणार आधुनिकीकरण: अश्विनी वैष्णव

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सोमवारी कोच देखभाल कारखान्याच्या पायाभरणी समारंभात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली, देशभरातील 200 रेल्वे स्थानकांना आधुनिक सेवा दिली जाणार आहे. त्यापैकी 47 रेल्वे स्थानकांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर 32 स्थानकांवर काम सुरू झाले आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी 20 वर्ल्डकपमधून बाहेर

भारताचा अव्वल वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमधून बाहेर गेला आहे. पाठदुखीने पुन्हा उचल खाल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर पडला होता. आता तो वर्ल्डकपमधूनही बाहेर पडला आहे. आता बीसीसीआय जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून कोणाला वर्ल्डकप खेळण्याची संधी देते हे पहावे लागले. सध्या मोहम्मद शमी, दीपक चाहर आणि मोहम्मद सिराज यांची नावे चर्चेत आहेत.

CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे घेणार जाहीर सभा

सूत्रांच्या माहितीनुसार, दसरा मेळाव्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी ठाण्याच्या टेंभी नाका इथं उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेच्या माध्यमातून ते थेटपणे एकनाथ शिंदे यांना आव्हान देणार आहेत. ही सभा उद्धव ठाकरेंसाठी गेम चेंजर ठरु शकते असंही मानलं जात आहे. कारण यानंतर काही दिवसांतच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यत आहे.

पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातला पूल न पडण्या मागचं कारण आले समोर

पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातला पूल शनिवारी रात्री 1 वाजून 7 मिनिटांनी जमीनदोस्त करण्यात आला आहे. स्फोटानंतर पुलाजवळ काही वेळ केवळ धुळीचे लोटच दिसत राहिले. हळूहळू धुळीचे लोट खाली साचले आणि चांदणी चौकातला पूल पडल्याचं दृश्य समोर होत. परंतु 600 किलो स्फोटकांनीही तुटला नाही. स्फोटात पुल 50 टक्केच पडला असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्यानंतर पुलाच्या मजबुतीवर पुणेकरांनी आश्चर्य व्यक्त केलं होत. तर हा पूल साधारण 30 वर्षांपूर्वी बार्ली इंजिनिअर्स या कंपनीने काही लाखात बांधला होता. त्याचं डिझाईन PWD चं होतं. बार्ली ही अनंत लिमये आणि सतिश मराठे यांची कंपनी होती.

तर लाचारांचा दसरा मेळावा महाराष्ट्रात का?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शिंदे गटावर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हणाले आहेत की "गद्दारांचे.. प्रेम झाले सुरत मध्ये, हनिमून झाला गुवाहाटी मध्ये पोटात कळ आली गोवा मध्ये.... मग मी म्हणतो, लाचारांचा दसरा मेळावा महाराष्ट्रात का? यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे गटात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान दरसा मेळावे येत्या बुधवारी होणार आहेत. शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा मेळावा BKC वर होणार आहे.

CM शिंदे यांची लोकप्रियता किती हे दसरा मेळाव्यात समजेल: चंद्रकांत पाटील

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांना लोकप्रियतावरुन टोमणा हाणला आहे. 'एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता किती वाढली हे दसरा मेळाव्यात समजेल. तसेच, आणि ही जी पोटनिवडणुक लागली आहे त्याच्यातही मुख्यमंत्री शिंदेंची लोकप्रियता दिसेल. राजकीय निवडणुक आहे. त्यामुळे सगळंच दिसेल''. अशी प्रतिक्रिया पाटील यांनी यावेळी दिली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला जाणार?

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मला त्यांच्या दसरा मेळाव्याचं आमंत्रण दिलं तर मी नक्की जाईल. परंतु तसं होणार नाही. कारण ते मला बोलावणारच नाहीत. जे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहेत त्यांनी शिंदे गटामध्ये सहभागी व्हावं. कारण ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची नसल्याची टीका राणेंनी केली.

शरद पवारांनी रयत शिक्षणसंस्था बळकावल्या: उदयनराजे

शरद पवारांवर निशाणा साधताना उदयनराजे यांनी म्हटलं की, "रयत शिक्षण संस्थेचं नाव बदलून आता पवार शिक्षण संस्था करा." उदयनराजे म्हणाले की, "रयत शिक्षण संस्थेच्या घटनेनुसार संस्थेचा अध्यक्ष हा राज्याचा मुख्यमंत्री असायला हवा. पण तसं होत नाहीय.

शिंदेंकडून काँग्रेस - राष्ट्रवादीला युतीची ऑफर, शरद पवारांचं मोठ वक्तव्य

शिवसेना भाजपा युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी केला आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खुलासा केला आहे. सेनेचा प्रस्ताव नेणाऱ्यांमध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही समावेश होता, असंही चव्हाणांनी म्हटलं आहे.

चांदणी चौकातील वाहतूक पूर्ववत

मागील अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी होत असलेल्या चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर काल दुपारपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर आज खडकांचे ब्लास्ट करण्यासाठी रस्ता बंद ठेवण्यात आला होता. आता पुन्हा दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. गेल्या पाऊण तासापासुन वाहनचालकांना थांबवून ठेवण्यात आले होते. खडकांचे ब्लास्ट करण्यासाठी दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आली होती आता दोन्ही बाजूचे रस्ते सुरू करण्यात आले आहेत

संघर्ष होतो पण मर्यादा पाळली पाहिजे; मर्यादा सोडणं राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही - शरद पवार

एका पक्षाचे दोन भाग झाले आणि ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचं सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून चालवलं गेलं. या गोष्टी होतात, यात काही नवीन नाही. संघर्ष होतो. पण त्याला काही मर्यादा ठेवली पाहिजे आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही. राज्यातले जबाबदार लोक आहे. त्यांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकायला हवीत. आणि ही पावलं टाकण्याची जबाबदारी आम्हा लोकांसारख्या सिनियर लोकांवर असेल, त्यापेक्षा राज्याच्या प्रमुखांवर अधिक आहे. यातून अपेक्षा अशी करूया की, त्यातून जी मांडणी उद्या ते मांडतील, त्यातून कटुता निर्माण होणार नाही. अशा प्रकारची मांडणी दोन्ही बाजूने झाली तर राज्यातलं वातावरण सुधारण्यास मदत होईल असंही शरद पवार म्हणलेत.

केंद्राच्या मर्यादित गॅस पुरवठा निर्णयावर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडुन आंदोलन 

केंद्र सरकारकडून नागरीकांना मर्यादित गॅसचा पुरवठा होणार असलेल्या घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात विरोध दर्शवण्यात आला आहे. केंद्र सरकारने वर्षाला फक्त 15 सिलिंडर मिळतील आणि त्यापुढील प्रत्येक सिलेंडर जास्त किंमतीने घ्यावा लागेल असा निर्णय घेतला या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी ने आंदोलन केले आहे. यावेळी महिलांनी विरोध म्हणून दिवाळी फराळाचे पदार्थ चुलीवर बनवले आहेत. चुलीवर करंजी, चकली या सारखे पदार्थ यावेळी बनवण्यात आले होते.1053 रुपये देऊन 15 सिलेंडर का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला आहे.

देशाला मिळाले पहिले स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टर

भारतीय सैन्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. देशातील पहिले स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टर आज भारतीय ताफ्यात सामील झाले आहे. जोधपूर हवाई तळावर स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरची एक स्क्वाड्रन तयार केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि देशाचे नवे CDS जनरल अनिल चौहान यांनी आज राजस्थानमधील जोधपूरला भेट दिली. ही हेलिकॉप्टर लष्कर आणि हवाई दलात सामील झाल्यानंतर त्यांची शक्ती अनेक पटींनी वाढणार आहे.

पोटनिवडणूक जाहीर पण चिन्हांच काय? शिवसेनेसमोर नवा पेच

मुंबईतील अंधेरी येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्य निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या विधासभेच्या जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर आता शिवेसेनेसमोर नवा पेच निर्माण झाला असून पक्षचिन्ह आणि नावावरून संभ्रम निर्माण झाला आहे.

“होय, मी फडणवीस आणि अमित शाह यांना भेटणार आहे”, खडसेंनी दिली कबुली

भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या आणि अमित शाह यांच्या भेटीबाबत दोन मोठे दावे केले आहेत. यानंतर खडसेंच्या भाजपच्या घरवापसीची चर्चा होऊ लागली होती. त्यावर आता स्वत: एकनाथ खडसे यांनी आपली बाजू मांडली आहे. खडसे म्हणाले की, होय मी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची भेट घेणार आहे, असं खडसे म्हणालेत. नाशिक मध्ये एका कार्यक्रमात मी देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली आहे. ते म्हणाले पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला कळवतो. मी त्यांना भेटणार आहे, असं खडसे म्हणाले आहेत.

तब्बल 72 तासानंतर बाबा समाधीतून येणार बाहेर

मध्यप्रदेशमधील बाबा पुरूषोत्तमानंद यांनी जवळपास ७ फूट कोल खड्ड्यात भू समाधी घेतली होती. त्यानंतर ते आता तब्बल ७२ तासानंतर बाहेर येत असून त्यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौरावर

राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौरावर आहेत. यावेळी बोलताना भंडारा जिल्ह्यातील सर्व विकासाची कामे मार्गी लावू त्याचबरोबर धान खरेदीतला भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असंही फडणवीस म्हणालेत. त्याचबरोबर जनहितासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासनही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

खरगे अध्यक्ष झाले तरी, यांच्यासारखे नेते बदल घडवू...शशी थरुर यांचं मोठं विधान

काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरुर आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यात थेट लढत होत आहे. खरगे यांना मिळणारा पाठिंबा पाहता तेच नवे अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. याचदरम्यान, शशी थरुर यांनी एक मोठं विधान केलंय. शशी थरुर यांनी आपण जर पक्षाचे अध्यक्ष झालो, तर कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार बदल घडवू असा दावा केला आहे. थरुर म्हणाले “आम्ही शत्रू नाही आणि हे काही युद्ध नाही. पक्षाच्या भविष्यासाठी ही निवडणूक आहे. खरगे पक्षाच्या पहिल्या तीन नेत्यांमधील आहेत. त्यांच्यासारखे नेते पक्षात कोणताही बदल आणू शकणार नाहीत. सध्या आहे तीच व्यवस्था पुढे कायम ठेवली जाईल. कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी बदल घडवू शकतो”.

तीन तास ऑफिसबाहेर बसवूनही शाहांनी खडसेंना वेळ दिला नाही; गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. या भेटीनंतर एकनाथ खडसे पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा देखील केला होता. तब्बल तीन तास वेटींगवर ठेवूनही अमित शाह यांनी खडसेंना वेळ दिला नाही, अमित शाह यांनी खडसेंची भेट घेतली नसल्याची माहिती समोर येत आहे. तसा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.

गृहमंत्री अमित शहा आजपासून जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असणार आहेत. नवरात्र उत्सवादरम्यान अमित शहा वैष्णोदेवीचे दर्शन घेणार घेणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता अमित शहा जम्मूला रवाना होणार आहेत. अमित शहा यांचा जम्मू-काश्मीर तीन दिवसीय दौरा असणार आहे. त्याचबरोबर अमित शहा श्रीनगर आणि बारामुल्ला जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज 26 वा दिवस

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज 26 वा दिवस आहे. भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटक राज्यात आहे. मैसूरमधून आज यात्रेला होणार असून सोनिया गांधी आज कर्नाटकला जाण्याची शक्यता आहे. 6 तारखेपासून भारत जोडो यात्रेत सोनिया गांधी सहभागी होणार आहेत. 

देशभरात दिवसभरात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. यामध्ये देशभरातील राजकीय घडामोडी, वाहतूक कोंडी, रेल्वे अपडेट, राज्यभरातीलही महत्वाच्या घडामोडी नवरात्र उत्सव, पार्श्वभूमीवर पुणे मुंबई शहरांमध्ये गर्दीमुळे वाहतूक कोंडीही होते या सर्व घडामोडींचे येथे जाणून घ्या प्रत्येक अपडेट