Today News: देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking News

Today News: देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सध्या राज्यभरात परतीचा पाऊस सुरू आहे. यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचबरोबर राजकीय घडामोडी, क्रीडा या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर 

पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी प्रवाशांचा मृत्यू

पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, दिवाळी मुळे रेल्वे स्टेशनमध्ये प्रचंड गर्दी आहे. त्यातच चेंगरून एकाचा मृत्यू झाला.

नेतृत्वावरील नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःहून बुडेल

भाजप राष्ट्रवादीचा पक्ष फोडत आहे, असा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. या टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरील नाराजीमुळे पक्ष स्वतःहून बुडेल.

आदित्य ठाकरेंची राणेंवर शेलक्या भाषेत टीका

आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांना मागील १६ वर्षांची सवयच आहे. त्यांनी मंत्री म्हणून केलेलं एक तरी चांगलं काम दाखवाव. चार पक्षात जावून त्यांनी एकही काम केलं नाही. जाऊद्या राणे यांनी त्यांच्याकडे असलेल्या मंत्रीपदाचा किमान फुलफॉर्म सांगावा, असं थेट आव्हान आदित्य यांनी दिल आहे.

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, माजी कॅबिनेट मंत्र्याची पक्षातून हकालपट्टी

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. याची पाहाणी करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र त्याआधीच मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बेस्टच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबईच्या सांताक्रुझ डेपोबाहेर बेस्ट कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु होते. यावेळी आंदोलक कर्मचारी काहीसे आक्रमक झाल्याने त्यांच्यावर पोलिसांनी लाठिचार्ज केला आहे. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष केतन नाईक यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

उद्धव ठाकरे उद्या पासून औरंगाबाद दौऱ्यावर

उद्धव ठाकरे उद्या पासून औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत, ते राज्यातील ओल्या दुष्काळाची पाहणी करणार आहेत.

उद्धव ठाकरेंची दहशत शिंदे, फडणवीस राज ठाकरे यांच्या मनात – अंबादास दानवे

उद्धव ठाकरेंची दहशत शिंदे, फडणवीस राज ठाकरेंच्या मनात असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हंटले आहे. उद्धव ठाकरेंची दहशत मनात असल्यानेच नव्या महायुतीचा प्रयोग सुरू असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही दानवे यांनी केली आहे.

75 हजार तरुणांना नोकऱ्या देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

येत्या आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघणार असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे. तरुणांना नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणार असंही फडणवीस म्हणालेत.

देशात कोरोनाचे 24 हजार सक्रिय रुग्ण

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या देशात 24 हजार 43 कोरोना रुग्ण आहेत.

पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे राज्य सरकार विरोधात आंदोलन

पुण्यात राष्ट्रवादीचे राज्य सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. सरकारकडून आनंदाची दिवाळी म्हणजेच अवघ्या 100 रुपयात दिवाळीचे सामान देण्याचा निर्णय घेण्यात आला होतं. दिवाळीनिमित्त स्वस्त धान्य किट ही फसवी योजना आहे असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. घोषणाबाजी आणि निदर्शनं करत राष्ट्रवादीने सरकारवर निशाणा साधला आहे.

पुणे सातारा महामार्गावर वाहतूककोंडी

पुणे सातारा महामार्गावर मोठ्या वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. या मार्गावर एक कंटेनर बंद पडल्यामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली आहे.

भाजपचे लक्ष्य 2024, 3 लाख मुस्लीम कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार

भाजप 2024 च्या दृष्टिकोनातून देशभरात 3 लाख मुस्लीम (अल्पसंख्यांक) कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार असल्याची माहिती भाजप राष्ट्रीय अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील 12 हजार अल्पसंख्य कार्यकर्त्यांना भाजप प्रशिक्षण देणार असून ‘भाजप मुस्लिम विरोधी असल्याचा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजपचे मुस्लिम कार्यकर्ते देणार उत्तर’ देणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरात तयारी सुरू केली आहे. सेक्युलर पक्षांच्या प्रचाराचा सामना करण्यासाठी भाजपने ही रणनिती आखल्याचे बोलले जात आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील बोरघाटात वाहतूककोंडी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील बोरघाटात मोठी वाहतूककोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झाली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या आणि शनिवार रविवार सुट्ट्या यामुळे या महामार्गावर ही वाजतूक कोंडी झाली आहे. दीड ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पुण्यातील पावसावरून सामनातून भाजपवर हल्लाबोल

पुण्यातल्या पावसावरून सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. बुडणारे पुणे हा स्मार्ट सिटीचा पाणउतारा आहे. भाजपने स्मार्टसिटीचे स्वप्न दाखवून पुण्याची दुरावस्था केली. पुण्यातल्या पावसाने भाजपचा कारभार उघडा पाडला अशा शब्दात भाजपवर सामनातून टीका करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशमध्ये भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी

मध्यप्रदेशच्या रिवामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झाले आहेत. 3 वाहनांची धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. बस टेम्पो यांची धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे.


नागपूर पुणे मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द

नागपूर पुणे मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ऐन दिवाळीत काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहेत. मनमाड-दौड सेक्शनमध्ये डबल लाईन नॉन इंटरलॉकिंगचे काम असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विदर्भातून पुण्याला ये-जा करणाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे.