दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळत असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे.
Breaking News
Breaking News Sakal

व्हायग्रा तस्करीप्रकरणी आणखी तिघे अटकेत

15 किलो केटामाइन आणि 23,000 व्हायग्रा गोळ्या जप्त केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने आणखी 3 आरोपींना अटक केली. अभय वसंत जडये, बाबासाहेब बाजीराव काकडे, शितेश सुरेश पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कर्नाटक दौऱ्यावर

अमित शाह २४ मार्चपासून कर्नाटक, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

अमृतपाल प्रकरणामध्ये आणखी चौघांना अटक

अमृतपाल सिंग प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांनी आणखी चौघांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पुढीत तपास सुरु असल्याची माहिती पोलिस महासंचालक सुखचैन सिंग यांनी दिली.

अनिल जयसिंघानीला २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

अमृता फडणवीस धमकी प्रकरणी अटकेत असलेला बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई न्यायालयाने २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.

सिसोदियांच्या जामिनावर २४ तारखेला सुनावणी

दिल्लीतल्या दारु घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या सीबीआय खटल्यातील जामीन प्रकरणी 24 मार्च रोजी लेखी सबमिशन दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

अभिनेता चेतन कुमारला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

कन्नड अभिनेता चेतन याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी बेंगळुरूमधील शेषाद्रिपुरम पोलिसांनी त्याला अटक केली होती.

गुढी घरी उभारु का शेजारी? विरोधी आमदारांची सरकारविरोधात घोषणाबाजी

झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…बळीराजाला मदत करा, नाहीतर खुर्च्या खाली करा…ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी?… वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी… सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… अशा घोषणा देत आणि बॅनर फडकवून व हातात गुढी घेऊन महागाई, अवकाळी पाऊस, या विषयावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात हल्लाबोल केला.

मुंबईत महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून आंदोलन; विधानभवनाला घेराव घालण्याच्या तयारीत

मुंबईत महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या विधानभवनाला घेराव घालण्याच्या तयारीत आहे. सीएसएमटी ते विधानभवन असा मोर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काढला आहे. महागाई, बेरोजगारीच्या विरोधात हा मोर्चा सुरू आहे.

धर्मांतर केलेल्‍या ए राजा यांची आमदारकी रद्द

रिश्चन धर्म स्‍वीकारल्‍यानंतर अनुसूचित जाती असल्याचा दावा करता येत नाही, असे स्‍पष्‍ट करत केरळ उच्च न्यायालयाने ‘सीपीएम’चे देवीकुलम मतदारसंघाचे आमदार ए. राजा यांची आमदारकी रद्द केली. या प्रकरणी काँग्रेचचे नेते डी. कुमार यांनी याचिका दाखल केली होती. दरम्‍यान, आता या निकालास ए. राजा सर्वोच्‍च न्‍यायालयात आव्‍हान देणार आहेत.

माजी नगरसेविकेसह कुटुंबावर तलावर हल्ला; माजी नगरसेवकासह 15 जणांवर गुन्हा

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील मेटतळे येथे माजी नगरसेविकेच्या कुटुंबावर तलावर हल्ला झाल्याची घटना साेमवारी रात्री घडली. या प्रकरणी पाेलिसांनी हल्लेखाेरांवर गुन्हा दाखल केला आहे. महाड येथून एका कार्यक्रमावर परतत असताना माजी नगरसेविका श्रद्धा राेकडे आणि त्यांच्या कुटुंबियांवर मेटतळे येथे हल्ला झाला. दबा धरुन बसलेल्या टाेळक्याने हा हल्ला चढविला. या हल्ल्यात राेकडे कुटुंब व त्यांचे परिचित असे पाच जण जखमी झाले. या सर्वांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

नितीन गडकरींना पुन्हा धमकीचे फोन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा धमकीचे फोन आल्याची माहिती आहे. गडकरींच्या नागपूर कार्यालयात फोनवरून धमकी आल्याचं बोललं जात आहे. 14 जानेवारीला बेळगाव तुरुंगातून गडकरींना काॅल आले होते, त्याच जयेश पुजारीच्या नावानं पुन्हा धमकीचा फोन आला आहे.

संजय राऊतांवर बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांनी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत न्याय मिळावा यासाठी ट्विटरवर छायाचित्रासह पाेस्ट केली. त्याबाबत नेटीझन्सनी मुलीची ओळख जाहीर हाेत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, राऊतांवर बार्शी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समाेर येत आहे.

अदानी प्रकरणाच्या चौकशीची मागणी, विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक

मोदी सरकारची उद्योगपती गौतम अदानींवर विशेष मेहरबानी आहे असा आरोप केला जात आहे. या मेहरबानीमुळेच एसबीआय, एलआयसीमधील जनतेचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला गेला. मात्र, अदानी घोटाळ्यामुळे जनतेचा पैसा बुडण्याची भीती निर्माण झाली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्रश्नावरून संसदेमध्ये विरोधी पक्षांचे खासदार हे मंगळवारी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संसदेच्या पहिल्या मजल्यावर हे खासदार जमले होते त्यांनी मोठाले फलक संसदेच्या बाल्कनीतून झळकावत घोषणाबाजी केली. ‘मोदी-अदानी भाई-भाई, देश को लूट के खाई मलाई’ अशा आशयाचे हे फलक होते.

पोलीस भरतीची चाचणी पुढं ढकलली

मुंबईच्या नायगाव पोलीस मैदानावर आज पोलीस भरतीची मैदानी चाचणी होती. या भरतीसाठी राज्यभरातून उमेदवार मुंबईत दाखल झाले होते. पण अवकाळी पावसामुळे मैदानात चिखल झाला आणि चाचणी पुढे ढकलली.

पुण्यातील व्यावसायिकाला ४६ लाखांचा गंडा

कांदा परदेशात विकून फायदा करून देतो, असं अमिष दाखवत पुण्यातील व्यावसायिकाला ४६ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. पुण्यातील कात्रजमधील एका व्यावसायिकाची फसवणूक झाली आहे. स्वप्नील बेल्हेकर यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धाप्पा भंडारी, गजेंद्र सिद्धाप्पा हे दोघंही कर्नाटकचे राहणारे असून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढं ढकलली

ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरण पुन्हा लांबणीवर गेले आहे. आज (मंगळवारी) होणारी सुनावणी पुढं ढकलण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण तसेच महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार होती. मात्र, आता ही सुनावणी २८ मार्च रोजी होणार आहे. महाराष्ट्र सरकारचे वकील तुषार मेहता हे आजच्या सुनावणीवेळी गैरहजर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली गेल्याच म्हटलं जात आहे.

अवकाळी पावसामुळे मुंबईत तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत

मुंबईसह उपनगरात होत असलेल्या मुसाळधार पावसामुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  पावसाचा मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम झाला आहे. पनवेल - सीएसटी गाड्या आर्धा तास उशीराने धावत आहे.  मुंबईमध्ये अनेक ठिकाणी  रेल्वे मार्गात अडथळे आल्याने वेळापत्रकात बदल झाला आहे.  

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला

देशासह राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झालेला कोरोना संसर्ग आता पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली आहे. 

अवकाळीमुळं नंदूरबारच्या मिरची व्यापाऱ्यांना 50 लाखांचा फटका

नंदुरबार जिल्हा हा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरची पीक घेतले जाते. इतर राज्यात मिरची निर्यात केली जाते परंतु अवकाळी पाऊस पडल्यामुळे याचा फटका मिरची पिकाला देखील बसला आहे. व्यापा-यांनी शेतकऱ्यांकडून मिरची विकत घेऊन सुकवण्यासाठी पथारीवर टाकली होती. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व्यापारी वर्गाची एकच तारांबळ उडाली. पथारीवर सुकवण्यासाठी टाकण्यात आलेली मिरची पावसामुळे खराब झाली.

औंध-बाणेर परिसरात पावसाला सुरवात

सिंहगड रोड, औंध बाणेर परिसरात पावसाला सुरवात झाली असून उत्तमनगर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल पहायला मिळत आहे.

फरार मेहुल चोक्सीविरोधातील रेड कॉर्नर नोटीस मागे

पंजाब नॅशनल बँकेतील १३,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी इंटरपोलच्या 'रेड नोटीस'मधून फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याचं नाव हटवण्यात आलं आहे. चोक्सी फ्रान्सच्या लियोन शहरातील इंटरपोलच्या मुख्यालयात दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे हे पाऊल उचलण्यात आले आहे. दुसरीकडे सीबीआयने मात्र या सगळ्या घडामोडीवर मौन बाळगले आहे. इंटरपोलने २०२८ मध्ये चोकसी विरोधात रेड नोटिस जारी केली होती. भारतातून फरार झाल्यानंतर तब्बल १० महिन्यानंतर नोटिस जारी करण्यात आली होती. त्याच वर्षी चोक्सी अँटिग्वा तसेच बारबुडाचे नागरिकत्व स्विकारले होते. चोक्सी आपल्याविरुद्ध रेड नोटीस जारी करण्याच्या सीबीआयच्या अर्जाला आव्हान दिले होते आणि हे प्रकरण राजकीय षड्यंत्राचा परिणाम असल्याचे म्हटले होते. चोक्सीने आपल्या याचिकेत भारतातील तुरुंगातील परिस्थिती, त्याची वैयक्तिक सुरक्षा आणि आरोग्य यासारखे मुद्देही मांडले होते. रिपोर्टनुसार, चोक्सीच्या याचिकेनंतर हे प्रकरण पाच सदस्यीय इंटरपोल समितीच्या कोर्टात गेले. या समितीला कमिशन फॉर कंट्रोल फाइल्स म्हणतात. त्यानंतर आता समितीने सुनावणीनंतर रेड नोटीस रद्द केली आहे.

मनमाड : कॉपी करु न दिल्याने विद्यार्थ्यांकडून शिक्षकावर दगडफेक

दहावीच्या पेपरदरम्यान कॉपी करु न दिल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकावर दगडफेक केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये घडली आहे. या दगडफेकीत शिक्षकाच्या डोक्याला आणि डोळ्याला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश दिनकर जाधव असं जखमी शिक्षकाचं नाव आहे.

चोरमंडळ म्हणजे काय ते समजून घ्या; हक्कभंग नोटिसीला राऊतांचं उत्तर

शिवसेनेशी गद्दारी करणाऱया शिंदे गटाचा उल्लेख ‘चोरमंडळ’ असा केल्या प्रकरणी देण्यात आलेल्या हक्कभंग नोटिसीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. यासंदर्भात विधिमंडळ प्रधान सचिवांना लिहलेल्या पत्रात हक्कभंग समितीवरच त्यांनी आक्षेप नोंदविला आहे. तसेच चोरमंडळ म्हणजे काय ते आधी समजून घ्या, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या

नाशिकच्या गंगापूर सातपूर लिंक रोड परिसरात तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या करण्यात आली आहे. आईला बेशुद्ध करून मुलीची हत्या करण्यात आली. गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांबाबत आजची सुनावणी महत्त्वपूर्ण असणार आहे. निवडणुका लांबणीवर पडणार की सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.

अवकाळी पावसाचा मेंढपाळानाही मोठा फटका

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील भांबर्डा या गावात एका मेंढपाळाच्या तब्बल 40 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा, गारपीट आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. या मेंढपाळाला आर्थिक मदत देण्याची मागणी सध्या धनगर समाजातून होत आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचं सावट आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस बरसला आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला असून इतर भागांमध्येही पावसाची शक्यता आहे. येत्या ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

Live Updates : मागच्या सात दिवसांपासून सुरु असलेला संप राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मागं घेतला आहे. तसेच मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळत असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. मुंबईतही रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागानं आधीच राज्यात पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला होता. यासह इतर देशभरातील बातम्यांचा आढावा आपण लाईव्ह ब्लाॅगच्या माध्यमातून घेणार आहोत..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com