MDH चे आजोबा कालवश; वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

धरमपाल गुलाटी हे MFCG सेक्टरमधील सर्वांत अधिक कमाई करणारे CEO होते.

नवी दिल्ली : देशातील मसाल्याची एक मोठी कंपनी महाशिया दी हट्टी म्हणजेच MDH मसाल्याचे मालक महाशय धर्मपाल यांचं आज निधन झालं आहे. सकाळी 5:38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 98 वर्षांचे होते. त्यांना कोरोनाही झाला होता. मात्र त्यातून ते बरे झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. व्यापार आणि उद्योगात उल्लेखनिय योगदान दिल्याबद्दल मागच्याच वर्षी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद्मभूषणने सन्मानित केलं होतं.

गुलाटी यांचा जन्म 27 मार्च, 1923 रोजी पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये झाला होता. 1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर ते भारतात आले होते. तेंव्हा त्यांच्याजवळ फक्त 1500 रुपये होते. भारतात आल्यानंतर त्यांना आपल्या कुंटुंबाच्या भरणपोषणासाठी टांगा चालवावा लागला. या कष्टातून त्यांनी लवकरच दिल्लीतील करोल बाग येथील अजमल खां रोडवर मसाल्याचे एक दुकान उघडले. 

हेही वाचा - मास्क वापरा, अन्यथा कोविड सेंटरमध्ये सेवा करा; या राज्याच्या उच्च न्यायालयाने केला आदेश जारी​
स्वत:चं करायचे कंपनीची जाहीरात
या दुकानातून सुरु केलेला मसाल्याचा व्यापार हळू-हळू इतका वाढत गेला की आज त्यांच्या भारतात तसेच दुबईमध्ये मसाल्याच्या 18 फॅक्टरी आहेत. या फॅक्टरीत तयार झालेले मसाले जगभरात पोहोचवले जातात. MDH मसाल्याचे 62 प्रोडक्ट्स आहेत. त्यांची कंपनी उत्तर भारतातील 80 टक्के बाजारावर आपला ताबा असल्याचा दावा करते. धरमपाल गुलाटी हे आपल्या उत्पादनांच्या जाहीराती स्वत:चं करायचे. टिव्हीवर त्यांना आपण मसाल्यांची जाहीरात करताना पाहिलंही असेल. त्यांना जगातील सर्वांत वयस्कर ऍड स्टार असं म्हणून संबोधलं जायचं.

हेही वाचा - Bhopal Gas Tragedy: ती मृत्यूची रात्र, हजारो लोकांना दिवसही पाहता आला नाही

धरमपाल गुलाटी यांचं शिक्षण फक्त इयत्ता पाचवीपर्यंतचं झालं होतं. पुढील शिक्षणासाठी ते शाळेत जाऊ शकले नाहीत. भलेही त्यांना औपचारिक शिक्षणातून माघार घ्यावी लागली असेल मात्र जगाच्या व्यावहारीक बाजारात मात्र त्यांचा हात कुणीच धरु शकलं नाही. युरोमॉनिटरच्या रिपोर्टनुसार, धरमपाल गुलाटी हे MFCG सेक्टरमधील सर्वांत अधिक कमाई करणारे CEO होते. 2018 मध्ये त्यांना जवळपास 25 कोटी रुपये इन-हँड सॅलरी मिळाली होती. विशेष म्हणजे ते आपल्या या सॅलरीतील 90 टक्के भाग गोरगरिबांना दान करायचे. ते 20 शाळा आणि 1 हॉस्पिटलदेखील चालवायचे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahashay Dharmpal of MDH Spices passes away at 98 MDH masale