महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेकडूनच; अन्य कोणाकडून नाही...

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जानेवारी 2018

शरण यांनी जीवन लाल कपूर चौकशी आयोगाच्या 1969 मधील अहवालासहित न्यायालयीन कामकाजाची सुमारे 4 हजार पाने अभ्यासून महात्मा गांधींची हत्या नथुरामनेच केल्याचा निर्वाळा दिला आहे. महात्मा गांधींच्या हत्येमागे कोणा परकीय गुप्तचर विभागाचा सहभाग असल्याचा दावा निखालस तथ्यहीन असल्याचेही शरण यांनी स्पष्ट केले आहे

नवी दिल्ली - "महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यानेच केली असून त्यांच्या हत्येमध्ये अन्य कोणत्याही अज्ञात व्यक्तीचा सहभाग नव्हता,' अशी माहिती ज्येष्ठ विधीज्ञ अमरेंद्र शरण यांनी आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयास दिली.

अभिनव भारत या संस्थेचे संस्थापक पंकज फडणीस यांनी महात्मा गांधी यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याचा दावा केला होता. या पार्श्‍वभूमीवर दाव्यामागील सत्यता तपासण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. शरण यांना या कामी संचित गुरु आणि समर्थ खन्ना यांनी सहाय्य केले. शरण यांनी जीवन लाल कपूर चौकशी आयोगाच्या 1969 मधील अहवालासहित न्यायालयीन कामकाजाची सुमारे 4 हजार पाने अभ्यासून महात्मा गांधींची हत्या नथुरामनेच केल्याचा निर्वाळा दिला आहे. महात्मा गांधींच्या हत्येमागे कोणा परकीय गुप्तचर विभागाचा सहभाग असल्याचा दावा निखालस तथ्यहीन असल्याचेही शरण यांनी स्पष्ट केले आहे.

"महात्मा गांधी यांच्या हत्येप्रकरणी वीर सावरकर आणि एकंदरच मराठी नागरिकांवर ठेवण्यात आलेल्या दोषास कसलाही पुरावा नाही. महात्मा गांधी यांच्या हत्येचा तपास हे भारताच्या इतिहासामधील सर्वांत मोठे कारस्थान आहे. यामुळे एक नवा आयोग नेमून या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी,'' असे फडणीस यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते.

मात्र महात्मा गांधींची हत्या नथुरामनेच केल्याचे शरण यांनी न्यायालयासमोर मंडलेल्या अहवालामधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Web Title: mahatma gandhi nathuram godse supreme court