
‘मेक इन इंडिया’ ही स्वदेशीची नवी व्याख्या; अमित शहांचा दावा
अहमदाबाद : ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या महात्मा गांधीजींच्या स्वदेशी चळवळीच्या नव्या व्याख्या आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. हुतात्मा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गांधीजींच्या ‘वॉल म्युरल’चे अनावरण शहा यांच्या हस्ते आज झाले.
साबरमती नदीच्या किनाऱ्यावर खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने मातीच्या कुल्हडपासून तयार केलेले गांधीजींचे म्युरल एका भिंतीवर लावले आहे. अमित शहा यांनी चरखा फिरवून या चित्रावरील पडदा दूर करत त्याचे अनावरण केले. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे उपस्थित होते. या कार्यक्रमात शहा म्हणाले,‘‘स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या पुनर्उभारणीसाठी गांधीजींनी ज्या संकल्पनांचा प्रचार केला, त्यांचा गेली अनेक वर्षे पंतप्रधान मोदी सत्तेत येईपर्यंत विसर पडला होता.
हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष
गांधीजी केवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले नाहीत तर, स्वदेशी, सत्याग्रह, स्वभाषा, साधन शुद्धी, अपरिग्रह, प्रार्थना, उपवास आणि साधेपणा असे देश उभारणीसाठीचे अनेक उपायही सुचविले होते. ब्रिटिशांची लढतानाही त्यांनी जनतेच्या मनात या संकल्पना रुजविल्या आणि त्याआधारावरच त्यांना स्वातंत्र्यानंतर राष्ट्रनिर्मिती करायची होती. दुर्दैवाने, गेली अनेक वर्षे फक्त बापूंच्या चित्रासमोर फुले अर्पण केली गेली आणि खादी, हस्तकला, स्वभाषा आणि स्वदेशी यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र गांधीजींच्या संकल्पनांना बळ मिळाले.’’
असे आहे म्युरल
१००
चौरस मीटर आकाराच्या ॲल्युमिनियम पत्र्यावर
२९७५
कुल्हडचा वापर
७५
कुंभारांचा सहभाग
भारताची आर्थिक उन्नती साधणे, या देशाला जगाचे उत्पादनाचे केंद्र बनविण्यासाठी आत्मनिर्भर भारत ही योजना आणि स्वदेशी उत्पादने वापरण्याचे १३० कोटी भारतीयांना केलेले आवाहन, या तिन्ही कल्पना बापूंच्या स्वदेशी चळवळीपासून प्रेरित आहेत. नवीन शैक्षणिक धोरणात स्वभाषेचा आग्रह आहे.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
Web Title: Make In India Ait Shah Mahatma Gandhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..