Kharge : "बकरी ईद में बचेंगे, तो मुहर्रम मे नाचेंगे"; PM पदाच्या उमेदवारीबाबत विचारताच खर्गे वैतागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mallikarjun Kharge Latest News

"बकरी ईद में बचेंगे, तो मुहर्रम मे नाचेंगे"; PM पदाच्या उमेदवारीबाबत विचारताच खर्गे वैतागले

भोपाळ : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सध्या धामधुम सुरु आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर या दोन उमेदवारांमध्ये ही थेट लढत होत आहे. यामध्ये वरिष्ठ नेते असलेल्या खर्गेंचं पारडं जड मानलं जात आहे. आज ते प्रचारासाठी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होते. याठिकाणी पत्रकार परिषदेत त्यांना 2024च्या पतंप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते काहीशी भडकले आणि त्यांनी याबाबत विचित्र उत्तर दिलं. (Mallikarjun Kharge bizarre response when asked about Congress PM face for 2024)

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर असल्यानं जर आपण अध्यक्ष बनलात तर सन २०२४च्या पंतप्रधान पदाचा काँग्रेसचा उमेदवार राहुल गांधी असतील की आपण? असा प्रश्न एका पत्रकारानं खर्गेंना विचारला. यावर खर्गे काहीसे त्रासलेल्या सूरात म्हणाले, आता माझं केवळ पक्ष संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाव आलं आहे. आमच्याकडं एक म्हण आहे, ती मी प्रत्येक ठिकाणी उद्धृत करत असतो, "बकरी ईद मे बचेंगे तो मुहर्रम मे नाचेंगे". आधी माझी ही निवडणूक संपू द्या, मला काँग्रेसचा अध्यक्ष बनू द्या. त्यानंतर आपण पंतप्रधानपदाबाबतच बघू.

काँग्रेस अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर कोणत्या गोष्टींवर भर असेल?

काँग्रेस अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर कोणत्या गोष्टींवर भर असेल? हे सांगताना खर्गे म्हणाले, उदयपूरच्या चिंतन शिबिरात जे निर्णय झालेत ते लागू करणं हे माझं प्राधान्याचं काम असेल. त्यासाठी मी सर्वांना भेटेन त्यांचं मत घेईन आणि त्याची अंमलबजावणी करेन. त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेतले जातील. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांचाही विचार घेतला जाईल. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली पक्ष दोनदा सत्तेत आला. त्यावेळी ज्या योजना सरकारनं केल्या त्या चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

हेही वाचा: Intel देणार कर्मचाऱ्यांना झटका! हजारोंच्या नोकऱ्यांवर येणार गदा; जाणून घ्या कारण

आमच्या समोर दुसरं आव्हान आहे ते भाजपचं. कारण भाजप संविधानिक संस्था संपवण्याचं काम करत आहे. त्याचबरोबर राहुल गांधींच्या नेृत्वाखाली आमची ६ सरकारनं आली. ही सरकारे मोदी-शहा या जोडीनं पाडली, आमचे आमदार चोरले. यामध्ये मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर, महाराष्ट्रातील सरकार त्यांनी पाडलं. एकीकडे म्हणतात काँग्रेसला जनाधार नाही. पण आम्ही आणलेलं सरकार त्यांनी पाडलं. त्यामुळं सर्वांनी मिळून मला या निवडणुकीसाठी उभं केलं आहे.