
ममता बॅनर्जी भाजपला म्हणाल्या, तुम्ही आगीशी खेळू शकत नाही
नवी दिल्ली : नूपुर शर्माला आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी का अटक केली नाही? प्रेषित मोहम्मद यांच्यावरील टिप्पणीशी संबंधित वाद हा भाजपने रचलेल्या षडयंत्राचा परिणाम आहे. याअंतर्गत देशातील लोकांमध्ये फूट पाडायची होती. लोकांमध्ये फूट पाडण्याचे भाजपचे धोरण आहे. ‘तुम्ही आगीशी खेळू शकत नाही’ असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सोमवारी (ता. ४) पुन्हा एकदा नूपुर शर्माला अटक करण्याची मागणी केली.
फुटीरतावादी राजकारणावर विश्वास ठेवत नाही. आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध अशा सर्वांसाठी आहोत, असेही ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. नूपुर शर्माच्या अटकेची मागणी ममता बॅनर्जी यांनी अशा वेळी केली आहे, जेव्हा कोलकाता पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तिच्यावर गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा: Gyanvapi Case : पुढील सुनावणी १२ जुलैला; ५१ मुद्यांवर युक्तिवाद
कोलकाता (kolkata) पोलिसांनी नूपुर शर्माला नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. नूपुर शर्माविरुद्ध कोलकात्याच्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. शर्माला २० आणि २५ जून रोजी दोन्ही ठाण्याच्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. प्रवास केल्यास जिवाला धोका आहे. अशा परिस्थितीत कोलकात्यात चौकशीसाठी येऊ शकत नाही, असे नूपुर शर्माने नोटिसांना उत्तर देताना सांगितले होते.
नूपुर शर्माने नुकताच सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ज्यामध्ये देशाच्या विविध भागांत तिच्यावर दाखल झालेले खटले दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यास सांगितले. त्यांच्या एका वक्तव्यामुळे देश पेटला आणि उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या झाली, असे शर्माला फटकारताना न्यायमूर्ती परडीवाला आणि न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले होते.
Web Title: Mamata Banerjee Arrest Nupur Sharma Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..