esakal | ममतांचा नंदीग्राममध्ये पराभव? प्रशांत किशोर यांच्या लीक सर्व्हेमुळे खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata_Banerjee_Prashant_Kishor

नंदीग्राममधील निवडणूक ही ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. कारण त्यांचे माजी निकटवर्ती आणि भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी हे ममतांविरोधात मैदानात उतरले आहेत.

ममतांचा नंदीग्राममध्ये पराभव? प्रशांत किशोर यांच्या लीक सर्व्हेमुळे खळबळ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

West Bengal Assembly Election 2021: कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, पण त्याआधीच तेथील मतदारसंघाचे एक्झिट पोलची चर्चा सध्या सोशल मीडियात जोर धरत आहे. त्यात फेक न्यूजचा माराही केला जात आहे. याबाबत भाजप आणि तृणमूलतर्फे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. 

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये फटका बसू शकतो. त्यांना नंदीग्राममध्ये पराभवाला सामोरे जावे लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आयपीएसीच्या अंतर्गत सर्व्हेतून ही गोष्ट समोर आली आहे. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची ही एजन्सी असून त्यांनीच ममता बॅनर्जी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. 

भाजप हिंसाचार खपवून घेणार नाही; पंतप्रधान मोदी​

नंदीग्राममधील निवडणूक ही ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. कारण त्यांचे माजी निकटवर्ती आणि भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी हे ममतांविरोधात मैदानात उतरले आहेत. सुवेंदू यांनी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी तृणमूलला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व्हेनुसार, भाजपला ३० पैकी २३ जागा मिळतील, तर तृणमूलला फक्त ५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या या सर्व्हेबाबत तृणमूलकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हा अहवाल बनावट असून भाजपकडून मुद्दाम तो अहवाल व्हायरल केला जात असल्याचे तृणमूलने म्हटले आहे. भाजपचे नेते आणि आश्वासनांप्रमाणेच हा सर्व्हेही विश्वास न ठेवण्यासारखा आहे. अशा प्रकारच्या खोट्या प्रचारामुळे भाजपला काही फायदा होणार नाही, असे ट्विट तृणमूलने केले आहे. 

बांगलादेश दौऱ्याने आचारसंहितेचा भंग; तृणमूलची मोदींवर कारवाईची मागणी​

दुसरीकडे, फेक न्यूजबाबत भाजपने मंगळवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. एका खासगी वृत्त वाहिनीचा बनावट सर्व्हे सोशल मीडियात शेअर केला जात आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीआधी १४४ कलम लागू करावे, अशी मागणीही भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये बाजपला सरकार स्थापन करण्याची ही योग्य संधी आहे. तसेच ममतांना नंदीग्राममध्ये फटका बसू शकतो असे ओपिनियन पोल वर्तविण्यात आल्यानंतर ममतांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करत नंदीग्राममध्येच तळ ठोकला. १ एप्रिलला नंदीग्राममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top