ममतांच्या 'हम्बा हम्बा, रम्बा रम्बा'वर भन्नाट मीम्स; व्हायरल व्हिडीओत का म्हणाल्या असं?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 February 2021

विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपने आपलं सर्वस्व लावलं आहे. कोणत्याही परिस्थितीत तिथे आपली सत्ता स्थापन व्हावी, यासाठी भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल गुरुवारी आपल्या पक्षाच्या जुन्या नेत्याची अशा काही प्रकारे खिल्ली उडवली आहे की, सोशल मीडियावर आता त्याचे मीम्स बनत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप हरतर्हेने या निवडणुकीत आपला वरचष्मा गाजवू इच्छित आहे. याचसाठी भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आपल्या पक्षात ओढून घेतलं आहे. तृणमूल सोडून भाजपमध्ये गेलेल्यांची ममता बॅनर्जी यांनी एका सभेमध्ये खिल्ली उडवली आहे. ही खिल्ली उडवताना त्यांनी चित्रविचित्र असे आवाज काढून त्यांची मजा घेतली. मात्र, त्यांनी उडवलेल्या या खिल्लीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच त्यावर मीम्स देखील बनवले जात आहेत. 

काय म्हटलंय ममता बॅनर्जी यांनी

ममता बॅनर्जी यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांची तुलना मीर जाफरशी केली आहे. सिराज उद्दौला यानं आपला मुकूट देऊन मीर जाफरला देशाची रक्षा करण्यास सांगितलं होतं. परंतु तो इंग्रजांमध्ये सामील झाला आणि देशाशी गद्दारी केली. याचप्रमाणे पक्षातील काही लोक भाजपमध्ये गेले आहेत, आणि आता ते ओरडत आहेत, 'हम्बा हम्बा, रम्बा रम्बा, कम्बा कम्बा, डम्बा डम्बा, बम्बा बम्बा, बुम्बा बुम्बा.' असं म्हणत आता ते खूप उच्छाद करत आहेत. चांगली गोष्ट आहे. हे जितक्या लवकर पक्ष सोडतील तेवढं चांगलं आहे, असं यावेळी त्या म्हणाल्या. 

हेही वाचा - हेलिकॉप्टरसाठी राष्ट्रपतींकडून हवंय कर्ज; महिलेच्या मागणीने गाव अचंबित

त्यांच्या या व्हिडीओवर सध्या तुफान मीम्स बनत आहेत. खरं तर विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपने आपलं सर्वस्व लावलं आहे. कोणत्याही परिस्थितीत तिथे आपली सत्ता स्थापन व्हावी, यासाठी भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डांपासून ते गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदी देखील पश्चिम बंगालमध्ये आतापासूनच प्रचार करत आहेत. अमित शहा यांनी काल गुरुवारी पश्चिम बंगालमधील ठाकूरनगरमध्ये ममता सरकारवर निशाणा साधला होता.  

2019 च्या लोकसभा निवडणुकीकनंतर तृणमूल काँग्रेसमधून आतापर्यंत 18 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अलिकडेच यातल्या अनेकांनी भाजपची वाट धरली आहे. यामध्ये ममता बॅनर्जी यांचे जवळचे असलेले शुभेंदु अधिकारी देखील सामील आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mamata banerjee takes a humba humba dig at ex colleagues memes viral